सातारा : जिल्ह्यातील कृषी खात्याशी संबंधित जे अहवाल शासनाला दिले जातात, त्याला पूर्णत: ब्रेक लावून कृषी अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले. शासन मागण्यांबाबत दखलच घेत नसल्याने आगामी तीव्र आंदोलनाचा इशाराच या कर्मचाºयांनी दिला आहे.
कृषी विभागाचा लाभार्थी विलास शंकर यादव व कृषी आयुक्त कार्यालयातील दक्षता पथकाचे कृषी उपसंचालक शिवराज ताटे यांच्यातील संबंधांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. १८ डिसेंबरपासून बेमुदत रजा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.
कृषी सहायक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी अधिकारी संघटना वर्ग २ क व कृषी अधिकारी संघटना वर्ग २, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग १ या संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सुमारे ६०० अधिकारी व कर्मचाºयांनी आपल्या विभागप्रमुखांकडे रजेचे अर्ज सादर केले. क्षेत्रीय कर्मचारी संपावर गेल्याने या विभागाचे काम ठप्प झाले.
दरम्यान, अधिकारी, कर्मचारी यांची भूमिका शासनाला अथवा शेतकºयांना वेठीस धरण्याची नसून केवळ एका तक्रारदाराच्या हट्टापोटी व कृषी उपसंचालक यांच्या पूर्वग्रहदूषितपणामुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे, असा आरोप अधिकारी कर्मचारी संघटनांनी केला आहे.काम ठप्प होणारकृषी विभागाने शासनाला सादर करण्याचे सर्व अहवाल थांबविले आहेत. पेरणी अहवालही शासनाला दिला नाही. १८ डिसेंबरनंतर शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार नाही. कोणत्याही योजनांची अंमलबजावणीदेखील होणार नाही. त्यामुळे काम पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.