* महसूल व पोलीस प्रशासनाची समन्वयाची भूमिका
सदाशिव मोरे। आजरा
आजरा तालुक्यातील ७५ कि. मी. च्या ६६ अतिक्रमित झालेल्या पाणंद रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे. लोकसहभागातून अतिक्रमणमुक्त झालेल्या पाणंद रस्त्यावर १ कोटींच्या दरम्यान खर्च झाला आहे. शेतकऱ्यांनीच पाणंद रस्त्यावर केलेले अतिक्रमण शेतकऱ्यांनीच स्वेच्छेने जमिनी देऊन खुले केले आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे मोठ्या संख्येने पाणंद रस्ते खुले होत आहेत.
पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महसूल विभागाने गावा-गावांत योजना राबविली. तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यासह गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी एकत्रित शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. पाणंदी खुल्या करण्याचे महत्त्व पटवून दिले. न्यायालयीन दावे थांबवून समझोता घडवून आणला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाणंदीवरील अतिक्रमणांमुळे असणारा वाद संपुष्टात आला आहे. पाणंदीवरील अतिक्रमण काढल्यामुळे सदर रस्त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना २३ नुसार दप्तरी होणार आहे. यापुढे या पाणंदीवर अतिक्रमण होणार नाही. पक्के रस्ते शासनाच्या विविध योजनांतून होणार आहेत. तालुक्यातील मुंगूसवाडी, हाजगोळी खुर्द, सुलगाव, मडिलगे, सोहाळे, हत्तीवडे, मुरूडे, आजरा, कर्पेवाउी, सावरवाडी, होनेवाडी, आवंडी, कर्पेवाडी खालसा, मुमेवाडी, मासेवाडी, भादवण, भादवणवाडी, झुलपेवाडी, उत्तूर, वझरे, धामणे, बहिरेवाडी, हरपवडे, विनायकवाडी, पेरणोली, घाटकरवाडी, सुळेरान, साळगाव, कुरकुंदे, आंबाडे, पारपोली, हाळोली, देवर्डे, शेळप, मोरेवाडी, येमेकोंड, चितळे, हांदेवाडी, कोळींद्रे, चाफवडे, सरंबळवाडी, वाटंगी, मलिग्रे, पोश्रातवाडी, गजरगाव, किणे, लाकूडवाडी या गावातील किमान १ ते ५ पर्यंत पाणंदी अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत.
-------------------------
* लोकचळवळ होण्याची गरज : प्रांताधिकारी डॉ. खिलारी पाणंदीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सर्व गावातील नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. महसूल व पोलीस प्रशासन मार्ग काढून देण्यास तयार आहे. आजरा तालुक्यातील अतिक्रमणमुक्त पाणंदी ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांमधील तंटे दूर होण्यास मदत होईल.
- डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी.
आवंडी येथील अतिक्रमणमुक्त झालेली पाणंद. दुसऱ्या छायाचित्रात यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने अतिक्रमणमुक्त पाणंदी करताना.
क्रमांक : १८०२२०२१-गड-०५/०६