कर्जमाफीचा लाभ आणखी ६६ हजार शेतकऱ्यांना
By admin | Published: July 5, 2017 11:29 PM2017-07-05T23:29:26+5:302017-07-05T23:29:49+5:30
कोल्हापूर विभागातील चित्र : तीन जिल्ह्यांसाठी २४० कोटीं मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकऱ्यांकडे २४० कोटी ६३ लाखांची थकबाकी असल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीत घेण्याची मागणी राज्यातून झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारने दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. दीड लाखावरील थकबाकीदारांना उर्वरित रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचबरोबर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के व जास्तीत जास्त २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने २००८ ला केलेल्या कर्जमाफीनंतर २०१२ पर्यंत चार वर्षांतील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना राज्यात व्यक्त होत होती. त्यामुळे २००९ नंतर थकीत असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.
एप्रिल २०१२ ते जून २०१६ अखेर कोल्हापूर विभागातील ९२ हजार ७२ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार होता. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कर्जमाफीची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतल्याने विभागातील ६६ हजार शेतकऱ्यांना २४० कोटी ६३ लाखांचा लाभ मिळणार आहे.