पारनेर : महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना कपाट खरेदीसाठी आलेल्या रकमेत सुमारे सात लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनेक अंगणवाड्यांनी सुपा येथील गणराज फर्निचरची बिले जोडली आहेत. प्रत्येकी पाच हजार रूपये कपाटाची रक्कम लावली आहे. अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीसाठी कपाटे घेण्यासाठी पाच हजार रुपयांचा निधी दिला होता. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी स्वत: कपाट घेण्याची मुभा दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने बालविकास अधिकारी व पर्यवेक्षिकांवर दबाव आणून एकाच ठिकाणाहून कपाटे खरेदी करण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कपाट खर्चाबाबत आता अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कोल्हे व पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी तालुक्यातील काही अंगणवाड्यांमध्ये जाऊन कपाट खरेदीची चौकशी केल्यावर अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. (तालका प्रतिनिधी) अंगणवाडी सेविकांना बळजबरीने कपाटे खरेदी करण्यास भाग पाडताना सुपा येथील गणराज फर्निचर या एकाच दुकानातून मोठ्या प्रमाणावर खरेदी दाखविण्यात आली. पारनेर शहरात कपाट विक्रीची मोठी-मोठी दुकाने असताना सुपा येथील त्या दुकानावर मेहेरनजर दाखविण्यात आली. त्या दुकानदाराने प्रत्येक अंगणवाडीला प्रत्येकी पाच हजार रूपयांच्या खरेदीची बिले दिली. जेवढे अनुदान ते सर्व खर्च दाखविण्यात आल्यामुळे आता त्या दुकानदाराचीही चौकशी होणार आहे. तालुक्यात सुमारे २४३ अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यांनी घेतलेल्या कपाटाची किंमत जास्तीत जास्त दोन ते तीन हजार रूपये असल्याने प्रत्येक कपाटामागे सुमारे तीन हजार रूपये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. कपाट खरेदी प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अंगणवाडी सेविकांच्या माथी त्याचे खापर फोडण्याचा प्रकार बालविकास प्रकल्पाधिकारी,पर्यवेक्षिका करीत आहेत. मात्र अंगणवाडी सेविकांनी स्वत: जर खरेदी करायचे असते तर जवळील गावातील दुकानातून कपाटे घेतली असती असे सेविकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून चौकशी सुरू आहे.अंगणवाडीने कपाट खरेदी कोठून केली, यासह अनेक बाबी चौकशीत समोर येणार आहेत. -किशोर काळे, गटविकास अधिकारी, पारनेर.