लाखाला दरमहा ८ हजार; ५ महिन्यांत मुद्दल परत; ६०० गुंतवणूकदारांना ३० कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:54 AM2023-07-31T11:54:57+5:302023-07-31T11:55:16+5:30
पाच महिन्यांनी मुद्दल परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या वेल्थ शेअर कंपनीमागे शहरातील एका गुंडाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा आठ हजारांचा परतावा आणि पाच महिन्यांनी मुद्दल परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या वेल्थ शेअर कंपनीमागे शहरातील एका गुंडाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
या गुंडाच्या मदतीने कदमवाडी परिसरातील एका शाळेतील लिपिकाने कोट्यवधी रुपये वेल्थ शेअरमध्ये गुंतवले आहेत. हे दोघेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.नेहरूनगर येथील संग्राम नाईक याने त्याच्या साथीदारांसह सुरू केलेल्या वेल्थ शेअर कंपनीद्वारे सुमारे ६०० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
महागड्या गाड्या अन् पैशांची उधळपट्टी
संग्राम नाईक याच्याकडे लाखो रुपये किमतीची आलिशान कार आहे. याच्याशी संबंधित असलेला लिपिक सतत नवनव्या महागड्या कार बदलत असतो. त्या जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.