३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ; सतेज पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:10 PM2020-01-26T16:10:42+5:302020-01-26T17:57:00+5:30

३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ

91 crore 96 lakhs to get a loan waiver benefit; Satej Patil's testimony | ३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ; सतेज पाटील यांची ग्वाही

३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ; सतेज पाटील यांची ग्वाही

googlenewsNext

कोल्हापूर : सत्तेवर येताच शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील ५७ हजार १९६ शेतकऱ्यांना ३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे दिली.

छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनी मुख्य शासकिय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पूरपरिस्थितीत कोल्हापूरकरांनी जो संयम आणि धैर्य दाखविले त्यांच्या वृत्तीला मी सलाम करत असल्याचे सांगितले.  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी  लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.

पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पुरुष गृह रक्षक पथक, महिला गृह रक्षक पथक, वन रक्षक दल, एनसीसी मुलांचे पथक, एनसीसी मुलींचे पथक, अग्निशामक पथक, स्काऊट बॉईज पथक, मुलींचे स्काऊट गाईड पथक, आरएसपी मुलांचे पथक, आरएसपी मुलींचे पथक, एअर स्कॉड्रन एनसीसी पथक, फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सीक लॅब व फिंगर प्रिंट ब्युरो व्हॅन पथक, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, दहशदवाद विरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, शिक्षण विभागाचा चित्ररथ, अग्निशामन वाहन, १०८ रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी चित्ररथ, तंटामुक्त अभियान चित्ररथ जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी- माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उप निरीक्षक मधुकर चौगुले, सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र नुल्ले, नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप अधीक्षक गणेश बिरादार, उप निरीक्षक योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिपक भंडवलकर, उपनिरीक्षक राहूल वाघमारे, रविकांत गच्चे, प्रितमकुमार पुजारी, सोमनाथ कुडवे, रोहन पाटील, किशोर खाडे, विक्रांत चव्हाण, विवेकानंद राळेभात, अभिजीत भोसले, प्रमोद मगर, भागवत मुळीक, अजित पाटील यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन गौरविण्यात आले.

खेळाडूंचा गौरव

क्रीडा क्षेत्रामध्ये विश्व विक्रम केल्याबद्दल डॉ. केदार साळुंखे, राष्ट्रीय युवा पुरस्कार ओंकार नवलीहाळकर, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७ डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल वडगाव, शालेय व सामाजिक कार्यात साईराज पांडे, जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत माणगाव, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शिवाजी पाटील, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता विनय जाधव, गुणवंत खेळाडू सुनील कोनेवाडकर आणि आभा देशपांडे, गुणवंत खेळाडू दिव्यांग कमलाकर कराळे, थेट पुरस्कार सोनल सावंत आणि वैष्णवी सुतार, जिल्हा उद्योग केंद्राकडील लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार प्रथक संजय डी. माळी, मे. फायर फ्लॉय फायर पंप्स, प्रा.लि., द्वितीय (विभागून) तानाजीराव बापूसाहेब पाटील मे. यशश्री पॉली एक्स्ट्रजन, तानाजी सावर्डेकर मे. यश रेफ्रिजरेशन, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थी मैथीली सुंदर शिंदे यांना ५० हजार आणि शेजल शंकर कांबळे यांना २५ हजार रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. खेलो इंडिया युथ गेम्स मधील ४२ खेळाडूंचा सामुहिक सत्कार यावेळी करण्यात आला.

देशभक्तीपर गीतांनी रोमांच उभे राहीले

सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या ल.कृ. जरग विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावरील समुह नृत्य केले. केंद्रीय प्राथमिक शाळा शिवाजी मंदिर वडणगे यांनी ग्रामीण लेझिम प्रकार सादर केला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ पथनाट्य सादर केले. संजीवन इंग्लिश मेडियम स्कुल रंकाळा यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत उपस्थितीत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी ‘माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमचे सुरु’ आणि अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारात सारे ही समुह गीते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

पूरग्रस्तांना मदतीचा हात

जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना एकूण ३२१ कोटी ४५ लाखाहून अधिक मदत वाटप केली आहे. अद्यापही उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे. पूरबाधित लोकांना देय असणारी सर्व मदत विनासायास व तात्काळ देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे ७८ हजार २२८ हेक्टरवरील तीन लाखांवर शेतकरी बाधीत झाले तर अवकाळी पावसामुळे १५८४ हेक्टरवरील ७८६१ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना रोख स्वरुपातील १६० कोटींची मदत तसेच २९५ कोटींची मदत कर्जमाफीच्या माध्यमातून सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे. 

पुलांची होणार तपासणी

महापुरामुळे जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन पुलांची सुरक्षितता तपासण्यासाठी 31 मोठ्या पुलांची आयआयटी मद्रास या संस्थेमार्फत करुन आयआयटीकडून सूचविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी सांगितले. पूर परिस्थितीला तोंड देण्याचे दृष्टीने रस्ते आणि पुलांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एशियन अर्थसहाय्यातून कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हायटेक कृषी साधन-संपदा निर्माण होणार

जिल्ह्यात यावर्षी ७ कोटीचा कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यात शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादीत मालावर प्रक्रिया करण्यासाठी १३ कोटींची योजना राबविली जात आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून हायटेक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १६ कोटीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. यामध्ये संरक्षीत शेती, प्रक्रिया उद्योग इ.चा फायदा शेतकऱ्यांना होणार असून एक प्रकारे हायटेक कृषी साधन-संपदा निर्माण होणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले

Web Title: 91 crore 96 lakhs to get a loan waiver benefit; Satej Patil's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.