Kolhapur News- बेडकाचे लावले लग्न, गाढवावरून काढली वाजत गाजत मिरवणूक; पावसासाठी 'या' गावात अनोखी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:46 PM2023-06-24T12:46:18+5:302023-06-24T12:47:45+5:30
पावसाने दडी मारली, मृगनक्षत्र ही कोरडे गेले
उत्कर्षा पोतदार
उत्तूर : उत्तूर येथे वळीव पावसाने दडी मारली, त्यानंतर मृगनक्षत्र ही कोरडे गेले. त्यामुळे ऊस पिके वाळली, भाताची पेरणी पावसा अभावी खोळंबली, विहिरी, धरणे कोरडी पडली आहेत. सर्वत्र पाण्याविना नागरीकांचे हाल होत आहेत. ते दूर करण्यासाठी नागरिकांनी बेडूक व बेडकीचे लग्न लावून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली.
रोहिणीचा पेरा कोरडा गेला, मृग नक्षत्र ही वाया गेले. परंतु पावसाचा एक थेंब नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पावसाला साकडे घालण्यासाठी उत्तूर मध्ये बेडूक व बेडकीचे लग्न लावण्यात आले. त्यासाठी एका पातेल्यामध्ये बेडूक व बेडकी ठेवून त्यांना हळद-कुंकू लावून त्यांचे लग्न लावण्यात आले.
नंतर गाढवाला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. त्या गाढवाच्या पाठीवर बेडूक व बेडकी ठेवलेले पातेले ठेवून गावातील प्रत्येक देवळात पानविडा ठेवून व नारळ फोडून पावसासाठी देवी देवतांना साकडे घालण्यात आले. ज्या ठिकाणाहून मिरवणूक काढली त्याच ठिकाणी मिरवणूक आणून हे गाऱ्हाणे पुर्ण केले.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. उत्तूरमध्ये नदी नसल्याने पाण्यासाठी लोक घागरी घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. अजून आठवडाभर जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ सदृश्य स्थिती होईल. पाऊस पडण्यासाठी पारंपारिक पद्धतीने बेडूक व बेडकीचे लग्न लावून गाढवावरून त्यांची मिरवणूक काढतात. - जगदीश हावळ