ए. एस. ट्रेडर्स फसवणूक: कंपनीशी संबंध नाही, संशयितांच्या वकिलांनी केला युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:43 PM2023-02-23T13:43:51+5:302023-02-23T13:44:24+5:30

त्यानंतरच संशयितांच्या अटकपूर्व जामिनाचा फैसला होणार

A. S. Traders fraud: no connection with the company, argued the lawyers of the suspects | ए. एस. ट्रेडर्स फसवणूक: कंपनीशी संबंध नाही, संशयितांच्या वकिलांनी केला युक्तिवाद

ए. एस. ट्रेडर्स फसवणूक: कंपनीशी संबंध नाही, संशयितांच्या वकिलांनी केला युक्तिवाद

googlenewsNext

कोल्हापूर : कमी कालावधीत मोठ्या गुंतवणुकीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी आमचा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद गुन्हे दाखल असलेल्या संशयितांच्या वकिलांनी बुधवारी (दि. २२) जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीत केला. जिल्हा न्यायाधीश (४) एस. पी. गोंधळेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २७) होणार आहे.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे सव्वापाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल होताच संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. संशयितांचे वकील शिवाजीराव राणे यांनी बुधवारी न्यायाधीश गोंधळेकर यांच्यासमोर युक्तिवाद केला.

फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संबंधित व्यक्तींचा काहीच संबंध नाही. ए. एस. ट्रेडर्सकडून करून घेतलेल्या सॉफ्टवेअरच्या कामाचे पैसे त्यांना देण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यांच्याशी अन्य कोणताही आर्थिक संबंध नसल्याची भूमिका ॲड. राणे यांनी न्यायालयात मांडली.

मात्र, फिर्यादी रोहित सुधीर ओतारी यांचे वकील महंतेश कोले यांनी त्यावर आक्षेप घेत, गुन्हे दाखल असलेले संशयित आणि त्यांचा ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संबंध असल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. पुढील सुनावणीत सरकारी वकील ए. ए. पिरजादे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतरच संशयितांच्या अटकपूर्व जामिनाचा फैसला होणार आहे.

कंपनीकडून दिशाभूल

ट्रेडविंग्स सोल्युशन कंपनीने व्यवसायाची चुकीची नोंद करून जीएसटी विभागाची फसवणूक केल्याचा दावा ए. एस. ट्रेडर्सविरोधी कृती समितीने केला आहे. तसेच ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संलग्न असलेल्या अन्य कंपन्यांची नोंदणी, मूळ उद्देश आणि प्रत्यक्षातील काम याबद्दलही विरोधी कृती समितीने आक्षेप नोंदविले आहेत.

Web Title: A. S. Traders fraud: no connection with the company, argued the lawyers of the suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.