मुंबईतून चिमणी केली टॅग; अवघ्या ८१ दिवसांत गाठले कझाकिस्तान!
By संदीप आडनाईक | Published: March 23, 2024 12:42 PM2024-03-23T12:42:42+5:302024-03-23T12:43:10+5:30
संशोधन अहवालातील नोंदी
कोल्हापूर : भारतीय खंडात आढळणाऱ्या तीन उपप्रजातींपैकी ‘स्पॅनिश स्पॅरो’ या प्रजातीच्या एका चिमणीने मुंबई ते कझाकिस्तान प्रवास ८१ दिवसांतच पूर्ण केला आहे. हा सर्वांत कमी कालावधी मानला जातो. काही चिमण्यांनी कझाकिस्तानशिवाय रशिया, नैऋत्य ताजिकिस्तान आणि पाकिस्तानापर्यंतही उड्डाण केलेले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने अलीकडेच सादर केलेल्या एका संशोधन अहवालात या स्थलांतराची माहिती संशोधकांनी नोंदवली आहे. मोबाइल टॉवर्स आणि चिमण्या कमी होण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही आणि त्याबद्दल कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, अशी माहिती सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे उपसंचालक आणि पक्षी अभ्यासक डॉ. गिरीश जठार यांनी दिली.
कझाकिस्तानच्या जांभीलपर्यंतचा प्रवास ८१ दिवसांत पूर्ण करणाऱ्या या ‘स्पॅनिश स्पॅरो’ प्रजातीमधील चिमणीला मुंबईत टॅग लावला होता. चिमण्यांच्या स्थलांतराचा सर्वांत जास्त कालावधी ८ वर्षांचा नोंदवलेला आहे. बीएनएचएसने टॅग केलेल्या पाच चिमण्यांपैकी ४ चिमण्या या राजस्थानातील भरतपूर येथे तर एका चिमणीला मुंबईत रिंग केले होते. भरतपूर येथे रिंग केलेली एका चिमणी अग्नेय कझाकिस्तानातील अलमटी येथे तर कझाकिस्तानच्या जांभील येथे रिंग केलेली एक चिमणी पुन्हा भरतपूर येथे परतल्याची नोंद झाली आहे. भरतपूरची एक चिमणी आठ वर्षांनी पाकिस्तानच्या हझ्रो जिल्ह्यात आढळली.
हाऊस स्पॅरोच्या आठ चिमण्यांच्या नोंदी
हाऊस स्पॅरो उपप्रजातीच्या आठ चिमण्यांच्या नोंदी संशोधकांनी नोंदवल्या आहेत. भरतपूर येथे रिंग केलेली ही चिमणी रशिया, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आढळली. नैऋत्य कझाकिस्तानमध्ये तीन आणि उत्तर कझाकिस्तानमध्ये एका चिमणीची नोंद झाली आहे. कझाकिस्तानातील तीन चिमण्यांपैकी एक दिल्लीत आणि तामिळनाडूच्या पॉईंट कॅलिमर वन्यजीव अभयारण्यात रिंग केलेली एक चिमणी बांगलादेशात आढळली. या प्रजातींतील चिमणीने सर्वांत कमी म्हणजे ९९ दिवसांत तर एकीने ३ वर्षांत स्थलांतर केल्याची नोंद आहे.
डॉ. जठार म्हणतात, वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या शहरात कमी असल्या तरी त्या पूर्ण हद्दपार झालेल्या नाहीत. चिमण्यांच्या पिलांना कीटक जे अन्न मिळवून देतात ते घरामागील अंगण आणि शहरांतील बागांमध्ये आता उपलब्ध होत नाही. चिमण्यांना माती आणि छतावरील कौले असलेल्या घरांमध्ये प्रजननासाठी जागा मिळते, जी फक्त गावांमध्ये उपलब्ध आहेत.