Kolhapur: सळईने मारल्यानेच शनिवार पेठेतील तरुणीचा मृत्यू; संशयित तिघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:49 PM2024-04-06T12:49:47+5:302024-04-06T12:50:30+5:30
कोल्हापूर : शनिवार पेठेतील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी संशयित तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी ...
कोल्हापूर : शनिवार पेठेतील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी संशयित तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी मृत तरुणी वैष्णवी हिची आई, भाऊ आणि मामा या तिघांना अटक केली होती.
‘लिव्ह इन’मध्येच राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा.शनिवार पेठ, कोल्हापूर) हिचा गुुरुवारी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी पोवार (वय ५०), भाऊ सूरज पोवार (वय २०) आणि मामा संतोष बबन आडसुळे (वय ३५, सध्या रा.देवठाणे, ता.पन्हाळा, मूळ रा.इचलकरंजी) या तिघांना अटक केली होती. त्यांनी वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली. त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले.
मृत वैष्णवी पोवार हिला देवठाणे (ता.पन्हाळा) येथे संतोष आडसुळे याच्या घरी नेऊन संशयित तिघांनी काठी, दोरी आणि लोखंडी सळईने मारहाण केली होती. तिला लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संशयितांना अटक केली होती.