कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पांसाठी बंधित निधी मिळाला आहे. निधी शिल्लक आहे. परंतु केवळ मार्गदर्शनाअभावी हे प्रकल्प उभारणीला विलंब होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना गती द्यावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत व्यक्त झाली.
अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सभापती वंदना जाधव, शिवानी भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यावेळी उपस्थित होते. सदस्य शिवाजी मोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, या प्रकल्पांबाबत फारशी माहिती ग्रामपंचायत सदस्यांना नसते. त्यामुळे त्यांना याची माहिती देण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांना मुख्यालयात न बसता गावोगावी गेले पाहिजे. निधी असताना कामे सुरू नाहीत, असे व्हायला नको. जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायती असताना, मनरेगामधून केवळ ८५ कामे सुरू आहेत.
सदस्य हेमंत कोलेकर म्हणाले, जलजीवन मिशनचे काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. महिन्यातून एकदा ही बैठक असताना महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित राहात नाहीत. तरी त्यांना समज द्यावी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे म्हणाले, सध्या २२३ योजनांचे सादरीकरण करण्यात आले असून, दोन कोटींपर्यंतच्या ५० योजनांना येत्या महिन्याभरात प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन आहे. यावेळी सदस्य उदयराज पवार, राणी खमलेट्टी, स्वरूपाराणी जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या. अभियंता दिनाचे औचित्य साधून याच सभेमध्ये सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चौकट
मेघोलीकरांना मदत करा..
मेघोलीचे धरण् फुटल्याने तळकरवाडीची पाणी योजना वाहून गेली आहे. शासनाकडून त्यांना निधी मिळण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधीतून त्यांना मदत करण्याचा ठराव करण्यात आला.
१५०९२०२१ कोल झेडपी ०२
कोल्हापूर जिल्हा परिषदेत बुधवारी अध्यक्ष राहुल पाटील आणि उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्याहस्ते अभियंता दिनाचे औचित्य साधून सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सभापती शिवानी भोसले, अजयकुमार माने, अशोक धोंगे उपस्थित होते.