कोल्हापूर : कोरोनाचा कहर रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदीत ब्रेक द चेन अंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान १,६६६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामधून २ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला तर १५० वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस दलाने केली.
शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात कोराेना नियमांचा भंग केल्याप्रकरणी १,६६६ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून २ लाख ३६ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. त्याशिवाय १५० वाहने जप्त करण्यात आली. ही जप्त केलेली वाहने कागदपत्रांची तपासणी करून दंड भरून वाहनमालकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. याशिवाय पोलीस व महापालिका कर्मचारी यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विनामास्कप्रकरणी ३९९ जणांवर कारवाई करत १ लाख ८ हजार ७०६ रुपये इतका दंड वसूल केला.