कोल्हापूर : राज्यात वन सेवानिवृत्तांच्या चौकशीची अद्याप ११0 प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे; पण येथून पुढे जाणीवपूर्वक कागदपत्रात निष्काळजीपणा करताना आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल, असा इशारा राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिला. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न सुटण्यास हातभार लागत असल्याने पुढेही असेच सहकार्य राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.महाराष्ट्र वन सेवानिवृत्त असोसिएशनचे ११ वे राज्यव्यापी अधिवेशन बुधवारी कोल्हापुरात झाले. यावेळी गुप्ता यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार झाला. यानंतर त्यांनी संवाद साधताना वरील उद्गार काढले.
महावीर महाविद्यालयातील आचार्य विद्यानंद संस्कृती भवनमध्ये दिवसभर झालेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन सेवानिवृत्त वनपाल दिनकर काकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक हणुमंत धुमाळ, संघटनेचे सी. आर. चिमोटे, व्ही. एम. देशमुख, किशोर मिश्रकोटीकर, जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रादेशिक पातळीवरील ३५ टक्के प्रकरणे निकालात निघाली आहेत, उर्वरित प्रश्न विभागीय स्तरावरील असल्याने तेथे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, लवकरच तेही सुटतील, असा विश्वास व्यक्त केला.
संघटना व प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे शक्य झाले असल्याचेही गौरवोद्गारही त्यांनी काढले. वन्यजीवचे सत्यजित गुजर यांनी सेवानिवृत्तांना उशिरा जरी पेन्शन मिळाली, तरी ती व्याजासह देण्याची तरतूद असल्याने निवृत्त लिपिकांच्या सल्ल्याने जुन्या प्रकरणातील त्रुटी दुरुस्त करा, प्रसंगी संघटनेने सल्लागार नियुक्त करावा, असेही सुचविले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी स्वागत केले. सी. आर. चिमोटे यांनी प्रास्ताविक केले. किशोर मिश्रकोटीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विजय सावंत यांनी आभार मानले. एम. आर. फुकट, एम. ए. अकील, पी. एस. पाटील, रामविलास शर्मा, राजू सावंत, विनोद देशमुख, एम. एन. लाभाते, आर. पी. दाढे, सी. जे. कांबळे, एस. टी. विधाते, एन. पी. गवई, सी. एम. अलोणे, प्रवीण पाटील, विजय भोसले, एस. बी. तडवळेकर, बी. आर. देशपांडे यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कोल्हापूरचा वन विभाग डिजिटलवन विभागातील कार्यालयीन कामकाज डिजिटल होत आहे; यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली सर्वप्रथम कोल्हापुरातच वापरली जाणार आहे. १0:२0:३0 या प्रणालीनुसार सेवानिवृत्तांचे प्रश्न कोल्हापुरात प्रभावीपणे सोडविण्याला प्राधान्य दिले आहे, असेही डॉ. बेन यांनी जाहीर केले.