कोल्हापूर : महाभारतातील अर्जुनाचे ध्येय एकच असल्याने त्याला पक्ष्याचा एकच डोळा दिसलेला. इथे तर याला जन्मजातच एकच डोळा..पण त्याने अथांग स्वप्न पाहत ते एकाच डोळ्याने पूर्ण करून अविरत संघर्षातून मिळवलेल्या यशाचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य कुटुंबाला दिले आहे. उत्तूर (ता.आजरा) येथील आदित्य अनिल बामणे, असे या विद्यार्थ्याचे नाव.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात आदित्यने बाजी मारली अन् त्याच्या अविरत संघर्षाचा पट उलगडत गेला. आदित्यचे आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणीच आदित्यला पायाचे व डोळ्याचे अपंगत्व. त्यामुळे कुटुंब निराश झाले; पण त्याचा उत्साह, त्याचा स्वच्छंदीपणा, हसरा चेहरा या कुटुंबाला नवी उमेद देत गेला. पुढे दोन वर्षांनंतर तो बोलायला शिकला, नव्हे वाचायलाही शिकला. काळाचा महिमा अगाध असतो. पुढे शिष्यवृत्ती परीक्षेसह दहावी, बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवत या पोराने कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य आणले.आता तर थेट यूपीएससी परीक्षेत देशात १०१५ वी रँक मिळवत शारीरिक अपंगत्वावर आपला संघर्षच मात करू शकतो, याचा प्रत्यय दिला. उत्तूरमध्येच प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आदित्यने कागलच्या नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. या शाळेतच खऱ्या अर्थाने घडल्याचे आदित्य सांगतो. मी अपंग असूनही या शाळेने सर्व उपक्रमांमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याचे त्याने सांगितले. दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवलेल्या आदित्यने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनायचे हे स्वप्न उराशी बाळगले.त्यामुळे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेतून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. याच कॉलेजमधून राज्यशास्त्रातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पदवीच्या दुसऱ्या वर्षात असतानाच स्पर्धा परीक्षेचा पूर्ण तयारीनिशी अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, कुटुंबाने पाठबळ दिल्याने दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवले.
डोळ्याचा त्रास पण..आदित्यला एकाच डोळ्याने दिसत असल्याने त्याला अभ्यास करताना अनेकदा त्रास जाणवला. मात्र, पुढे सरावाने याही समस्येवर मात केल्याचे तो आवर्जून सांगतो. कोणत्याही परिस्थितीला स्वीकारायला हवे या मानसिकतेतून मी माझे अपंगत्व विसरून केवळ ध्येय समोर ठेवले. रोज आठ तास अभ्यास सुरू ठेवला. त्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच हे यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मानसिक ताण अधिक येतो. त्यामुळे आपली क्षमता ओळखून मुलांनी या परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. -आदित्य बामणे, उत्तूर