कुरुंदवाड : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला शिरढोण (ता शिरोळ) येथील शाळकरी मुलगा आदित्य मोहन बंडगर (वय १९) शुक्रवारी पंचगंगा नदी काठी खोल खड्रेड्यात व्हाईट आर्मी, रेस्कू फोर्सच्या जवानांना सुखरूप सापडला. दहा ते बारा फूट खोल खड्डा, झाडी, मगर, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर, पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही, मदतीसाठी कोणीही नाही, समोर मृत्यू दिसत असतानाही हार न मानता मदतीसाठी कोणीतरी येतील या आशेवर जगणारा आदित्य अखेर नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप परतला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकासह, चार दिवसांपासून शोधकार्य राबविणाऱ्या पथक, पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.इयत्ता अकरावीत शिकणारा आदित्य सोमवारी (दि. १८) अचानक बेपत्ता झाला होता. शोधूनही सापडत नसल्याने नातेवाईकांनी कुरुंदवाड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मात्र मंगळवारी आदित्यचे चप्पल शिरढोण पंचगंगा नदी घाटाजवळ आढल्याने नदीत पडला असल्याची शंका उपस्थित करुन रेस्कू फोर्सच्या जवानांनी चार दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने पंचगंगा नदी पात्रात शोध घेत होते.मात्र सापडत नसल्याने ड्रोनचाही वापर केला होता. रेस्कू फोर्सच्या जवानांनी शुक्रवारीही शोध मोहीम सुरुच ठेवली होती. यावेळी काहीजन नदीकाठी असलेल्या जयहिंद सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या जॅकवेल लगत असलेल्या खोल खड्ड्यातून बारीक आवाजात मदतीसाठी हाका मारत असल्याचे ऐकू आल्याने काही युवकांनी खड्यात डोकावून पाहताच आदित्य असल्याचे दिसले. त्यामुळे रेस्कू फोर्सचे जवान, नातेवाईक, व इतर लोकांनी खड्यात उतरुन त्याला बाहेर काढले. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही त्यामुळे अंगात थकवा होता. बोलण्यासाठी ताकदही नाही आणि भेदरलेल्या स्थितीत असल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले. शोध मोहिमेत रेस्क्यू फोर्सचे हैदरअली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे,नितेश व्हणकोरे,निशांत गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.नशिब बलवत्तर म्हणून..नदी पात्रात शोधूनही आदित्य सापडत नसल्याने रेस्कूच्या जवानांनी नदी पात्रात ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली होती. यावेळी नदीपात्रात ड्रोनमध्ये मगर दिसली होती. त्यामुळे आदित्य मगरीचा शिकार तर झाला नसेल ना? अशी शंकाही व्यक्त केली जात होती. मात्र अशा जिवघेण्या संकटातून आदित्य सुखरूप सापडल्याने त्याच्या नशिब बलवत्तरची चर्चा होत आहे.
Kolhapur: पंचगंगेकाठी गाळात पाच दिवस अडकला, नशीब बलवत्तर म्हणून वाचला; आदित्य बंडगरचा जीवघेणा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 1:46 PM