वस्त्रनगरीत गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:34+5:302021-09-19T04:25:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार, श्री विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे मंडळांनी कोणत्याही वाद्यांशिवाय ...

The administration is ready to bid farewell to Ganaraya in Vastranagari | वस्त्रनगरीत गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

वस्त्रनगरीत गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार, श्री विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे मंडळांनी कोणत्याही वाद्यांशिवाय आपल्या मंडळाची मूर्ती वाहनातून प्रशासनाने नियोजन केलेल्या मार्गावरुन शहापूर खणीतच विसर्जित करावी. संपूर्ण विसर्जन प्रक्रियेवर पोलीस प्रशासनासह सीसीटीव्ही कॅमेरा व ४ फिरत्या पथकांची नजर राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.

कोणत्याही मंडळाला पारंपरिक वाद्ये, स्पिकर, लेसर शो अशा कोणत्याही गोष्टींचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर चौकात थांबता येणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियमानुसार रात्री १० वाजता सर्व आस्थापना बंद करण्यात येणार असल्यामुळे त्याआधीच सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन उरकावे. शहरात अद्याप ५२८ सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन होणे बाकी आहे. शहापूर खण परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच सेफसिटी अंतर्गत शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून मिरवणूक रेंगाळत ठेवणे, एकाच ठिकाणी थांबणे, गर्दी करणे आदींवर लक्ष राहणार असून, संबंधित फिरत्या पथकाला वायरलेसवरुन सूचना देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गतवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्षाला परवानगी देण्यात आलेली नाही.

चौकट

विसर्जनाच्या ठिकाणची यंत्रणा

शहापूर खण येथे विसर्जनाच्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे जेसीबी, २ रुग्णवाहिका, ३ आयशर टेम्पो, २ क्रेन, २ बोटी, २०० अधिकारी व कर्मचारी, १०० स्वयंसेवक, २५ पट्टीचे पोहणारे, अग्निशमन दलासह आरोग्य विभाग, आपत्कालीन व अतिक्रमण विभाग सज्ज ठेवला आहे. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

वाहतूक मार्गात बदल व विसर्जन मार्ग

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक बंद राहणार असून, पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. छत्रपती शाहू पुतळा ते झेंडा चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. तर कबनूर, पंचवटी, तीनबत्ती चौकाकडून विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांना शाहू पुतळा ते डेक्कनमार्गे शहापूर खणीकडे जाण्यासाठी मार्ग असणार आहे. उत्तम प्रकाश टॉकीज, संभाजी चौक, चांदणी चौककडून येणाऱ्या मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कनमार्गे शहापूर खणीकडे, गांधी पुतळाकडून जनता चौकाकडे येणाऱ्या मंडळांना जनता चौक एकेरी मार्ग बंद करण्यात आला असून, मंडळांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जनता चौक एकेरी मार्गातून बँक ऑफ इंडिया रिक्षा स्टॉपमार्गे थोरात चौक ते शहापूर खण असा विसर्जन मार्ग असणार आहे. झेंडा चौक ते जनता चौक आणि महासत्ता चौक ते थोरात चौक हे मार्ग सर्वप्रकारच्या चारचाकी व अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहेत. शहापूर खण येथे विसर्जनानंतर परतणारी वाहने सोयीनुसार सांगली नाका व पंचगंगा कारखानामार्गे मार्गस्थ होतील, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी सांगितले.

Web Title: The administration is ready to bid farewell to Ganaraya in Vastranagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.