यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील श्रेया संदीप यादव या मुलीचे कोरोनामुळे पितृछत्र हरपल्याने तिची शैक्षणिक जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील यांनी घेतली आहे. यापूर्वीही पाटील हे पितृछत्र हरवलेल्या चार मुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पेलत असून सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य पार पाडत आहेत.
जांभळी गावातील गरीब कुटुंबातील पितृछत्र हरवलेल्या मुलींचे शिक्षण आर्थिक परिस्थितीअभावी बंद पडू नये. या सामाजिक भावनेने येथील सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील यांनी नुकतेच कोरोनामुळे पितृछत्र हरवलेल्या श्रेया यादव या मुलीच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वीही शेतमजूर असलेल्या कुटुंबातील दीपाली दीपक पाटील, प्रणाली दगडू कांबळे, साधना दिगंबर मोरे, मर्जिना राजू मुल्ला चार मुलींची दहावी पर्यंतची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून ते पार पाडत आहेत. नाना पाटील यांनी राहुल आवाडे युवाशक्तीच्या माध्यमातून शेतमजूर महिलांचा मोफत जीवन विमा उतरवणे यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या कार्यात त्यांना वर्धन होसकल्ले, मारुती चव्हाण यांचे सहकार्य लाभत आहे.
फोटो - १७०५२०२१-जेएवाय-०१-नाना पाटील