कडक लॉकडाऊनमध्ये आजऱ्यात गेली आठ दिवस स्मशानशांतता होती.
मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याचे जाहीर झाल्यानंतर आज प्रत्येक घरातील नागरिक खरेदीसाठी बाहेर पडला होता. आजरा अर्बन बँक ते शिवाजी पुतळा, संभाजी चौक ते महागाव रस्ता, रवळनाथ मंदिर परिसर याठिकाणी मोटारसायकलच्या रांगा लागल्या होत्या. तोंडाला मास्क नसणे व सामाजिक अंतर न ठेवणाऱ्यांवर पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. तरीही नागरिक विनामास्क बाजारपेठेतून फिरताना दिसत होते.
सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, असे माईकवरून सकाळी ९ वाजल्यापासून पुकारायला सुरू केले होते. याचपद्धतीने नगरपंचायतीचे सुनील मटकर व एम. डी. कांबळे यांनीही गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. मात्र याला नागरिकांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. ११ वाजल्यानंतर पोलिसांनी याचा वचपा काढत दुकाने बंद करण्यास सांगितले व नागरिकांना हाकलून लावले. काही ठिकाणी बळाचाही वापर केला. त्यामुळे दुपारी बारानंतर बाजारपेठेत पूर्ण शुकशुकाट जाणवत होता.
-----------------
* सामाजिक अंतराचे आखलेले चौक शोभेसाठीच
आजरा शहरातील दुकानांसमोर सामाजिक अंतर ठेवून नागरिकांनी खरेदी करावी, यासाठी नगरपंचायतीतर्फे चौक आखले आहेत. या चौकात उभारुन वस्तू खरेदी कराव्यात, ही अपेक्षा होती. मात्र या चौकाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत एकमेकांच्या अंगावर पडून दुकानातून खरेदी सुरू होती. त्यामुळे सामाजिक अंतरासाठीचे आखलेले चौक फक्त शोभेसाठीच दिसत होते.
------------------------
* बाजारपेठेतील गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार
सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत आजऱ्याच्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. कोरोनाच्या सर्व नियमांना तिलांजली देत नागरिकांनी किराणा, भाजीपाला, मेडिकल व अन्य दैनंदिन वस्तूंची खरेदी केली. याच गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
-------------------------
फोटो ओळी : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आजऱ्याच्या बाजारपेठेत खरेदीसाठी उडालेली झुंबड.
क्रमांक : २४०५२०२१-गड-०३