दोघेही आजारपणामुळे अंथरुणाला खिळून, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:11 PM2022-07-26T19:11:08+5:302022-07-26T19:11:36+5:30
दोघेही कित्येक दिवस आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. पत्नी पतीशिवाय कोणालाही ओळखत नव्हत्या.
कोल्हापूर : शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील महादेव मारुती मायनेकर (वय ७८) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शनिवारी पत्नी विमल महादेव मायनेकर (वय ८१) यांचे पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे मायनेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
महाद्वाररोडवरील जुने कापड व्यापारी महादेव मायनेकर व त्यांच्या पत्नी विमल हे दोघेही कित्येक दिवस आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. मायनेकर यांचा मुलगा व कुटुंबीय त्यांची सेवा करीत होते. मात्र, पत्नी पतीशिवाय कोणालाही ओळखत नव्हत्या. त्याही पती शेजारील बेडवर आजारपणामुळे झोपून होत्या. त्यामुळे पती महादेव स्वत: काय हवे असेल त्याप्रमाणे त्यांचीही सेवा कुटुंबीयांकडून करून घेत होते.
शुक्रवारी महादेव यांचे दीर्घ आजारापणामुळे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पत्नी विमल यांना पती वारल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर त्या दुपारपासून अस्वस्थ झाल्या. सायंकाळी त्यांचीही तब्येत अचानक बिघडली आणि त्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आई-वडिलांचा एक दिवसाआड मृत्यू झाल्याने मायनेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे शाहूपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.