विमान घिरट्या घालतंय, बास्केट ब्रिजही झालाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:23 AM2018-03-12T00:23:55+5:302018-03-12T00:23:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरवर विमान घिरट्या घालायला लागलंय, बास्केट ब्रिज झालाय, पर्यायी शिवाजी पूलही पूर्ण झालेला आहे, अशी खासदारांना स्वप्ने पडत आहेत; पण हे विमान कोल्हापुरात कधी उतरणार, हे त्यांनाच माहीत, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता केली. निवडणुकीतील शत्रू निश्चित आहे. तुमची तलवार उपसा, मी आणि मुश्रीफ तुमच्या पाठीशी असल्याचा निर्वाळाही देत संजय मंडलिक यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले; तर मंडलिक यांनी निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करावी, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांना सुचविले.
शहरातील सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक ते कळंबा फिल्टर हाऊस या रिंग रोडला ‘लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता टीकेचे लक्ष्य बनविले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, संजय मंडलिक हे बरेच दिवस गुळमुळीत बोलत होते. त्यांनी प्रथमच कळ काढली. आता निवडणुकीतील शत्रू निश्चित झालेला आहे. मग बोलायला सुरू करा. आम्ही दोघे तुमच्यासोबत आहोतच. तुम्ही तलवार उपसा. ती तळपत ठेवूया. लढायचं तर नेटाने व जिद्दीने लढूया, असे पाटील म्हणताच, व्यासपीठावरून हसन मुश्रीफ म्हणाले, ही सदाशिवराव मंडलिक यांची शिकवण आहे. हाच धागा पकडून पुन्हा सतेज पाटील पुढे म्हणाले, दिल्लीतून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरपूर पैसा येईल असे वाटले म्हणून साºया तडजोडी केल्या; पण प्रश्नांची संख्या आणि आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. लोकसभेत ७००, ८०० प्रश्न विचारलेत. आता तो आकडा दोन-तीन हजारांवर जाईल; पण त्यांतील सोडवणूक किती प्रश्नांची झाले, हे त्यांना आणि जनतेला माहीत असेही पाटील म्हणाले. दिल्लीतील एक संस्था कोºया लेटरहेडवर सह्या घेऊन प्रश्न तयार करून लोकसभेच्या अधिवेशनात टाकते. त्यातून ‘हे’ प्रश्न विचारले जातात, हे मला खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. अशी प्रश्न विचारण्याची पद्धत असेल तर ती विचार करायला लावणारी आहे. ते विचारलेले प्रश्न हे उत्तर प्रदेश, बिहारमधील असतील, तर ते कोल्हापूरच्या काय कामाचे? असेही पाटील म्हणाले.
नऊ कोेटींचा रेडा, नट-नट्या नाचविल्या नाहीत
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सदाशिवराव मंडलिक यांच्यावर लोकांचे अतोनात प्रेम होते. त्या प्रेमाचे त्यांनी कुठेही प्रदर्शन भरविले नाही. त्यांनी कुठे नऊ कोटींचा रेडा आणला नाही अथवा नट-नट्या नाचविण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यांची लोकांच्या प्रेमाशी नाळ जुळली होती. आगामी निवडणुकीसाठी रस्ते नामकरणाच्या निमित्ताने संजय मंडलिक यांनी प्रचाराचा नारळच फोडला असावा असे वाटते; पण त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
शिवाजी पुलाचा प्रश्न संभाजीराजेंकडून मार्गी
संजय मंडलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरला मोठा निधी येण्याची अपेक्षा होती; पण आली ती फक्त विमानतळ, बास्केट ब्रिज आणि पर्यायी पुलाची आश्वासनेच. त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यावर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी आहे. पर्यायी पुलाचा प्रश्न विद्यमान खासदार लोकसभेत मांडतानाच त्यांना तो मंजूर होऊन राज्यसभेकडे गेल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नाला चालना दिल्याचे स्पष्ट दिसते.
डिसेंबरमध्ये निवडणूक, मरगळ झटका
संजय मंडलिक, आता तुम्ही बाहेर पडा. कळ काढली आहे. हसन मुश्रीफ आणि मी तुमच्यासोबत आहे. मरगळ झटका, डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुकीची शक्यता आहे. आम्ही सोबत आहोतच. तुम्ही तयार व्हा. सर्वांना हवा असणारा पुरोगामी सर्वांगीण विचाराचा विजय करायचा आहे. त्यासाठी सर्वजण तत्पर राहूया, असेही पाटील म्हणाले.