विमानतळासाठी आमदार नव्हे, तर खासदार व्हावे लागते; उदय सामंतांचा सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:38 PM2024-04-09T12:38:00+5:302024-04-09T12:38:33+5:30
कोल्हापूर : येथील विमानतळ अतिशय उत्तम आणि आकर्षक झाले आहे. कोणीही काही म्हणो मात्र विमानतळाच्या विकासाच्या कामासाठी आमदार नव्हे, ...
कोल्हापूर: येथील विमानतळ अतिशय उत्तम आणि आकर्षक झाले आहे. कोणीही काही म्हणो मात्र विमानतळाच्या विकासाच्या कामासाठी आमदार नव्हे, तर खासदार व्हावे लागते, असा उपरोधिक टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. महायुतीच्यावतीने आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, वीरेंद्र मंडलिक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते. महाराष्ट्रात नव्हे, तर भारतात इंडियाचे ३५ खासदार असतील, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सामंत म्हणाले, कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारने २७४ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून विमानतळाचे आधुनिकीकरण झाले. एवढा निधी आमदार फंडातून येत नाही. त्याला खासदार व्हावे लागते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून आतापर्यंत ३४ हजार उद्योजक तयार झाले असून, त्यातून सुमारे एक लाखाहून अधिक रोजगार निर्माण झाला आहे. म्हसवड येथे तीन हजार एकरमध्ये कॉरिडॉर निर्माण केला असून, उद्योजकांसाठी महावितरणला साडेआठ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत.
औद्योगिक वसाहतीतील दादागिरी रोखण्यासाठी उद्योजकांनी धाडस दाखविल्यास त्यांना पोलिस संरक्षण दिले जाईल. या लोकशाहीच्या उत्सवात उद्योजकांनी सकारात्मक राहून मतदान करावे. यावेळी अजय सप्रे, सारंग जाधव, बाबासाहेब कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, दीपक चोरगे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिश्चंद्र धोत्रे यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान मुंढे यांनी आभार मानले.