ज्याप्रमाणे चिखलात निर्माण झालेले कमळ स्वतःच्या हिमतीवर देवाच्या मुकुटावर विराजमान होते, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन यमगे येथे २७ जानेवारी १९४२ रोजी शंकरराव पाटील यांचा जन्म झाला. राजकीयदृष्ट्या कागल तालुका हा महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनशील मानला जातो. टोकाची राजकीय ईर्ष्या असलेला तालुका असून देखील त्यांचे सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे या सर्वांशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच राजकारणातील अजातशत्रू म्हणून देखील त्यांची ओळख होती. शिक्षक असलेले आजोबा दादोजी विठोजी पाटील व सामाजिक कार्याची जाणीव असलेले व गावचे सरपंच असलेले त्यांचे वडील आत्माराम दादोजी पाटील तसेच २५० ते ३०० सदस्यसंख्या असलेल्या सरनोबत परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. पूर्वजांनी घालून दिलेल्या आदर्शांची जपणूक करून संपूर्ण परिवाराला एकसंध ठेवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. शंकरराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
.........
- दिलीपसिंह पाटील
सरपंच, यमगे