अवघ्या पावणेतीन मिनिटात सांगतो १९५ देशांच्या राजधान्या.
मुरगूड : अक्षरांचा आणि शब्दांचा गंध नसलेल्या पण केवळ मौखिक बुद्धिमत्तेच्या जोरावर पाठांतराचे नवे शिखर गाठणाऱ्या सहा वर्षीय अजिंक्यच्या पराक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.
जगातील १९५ देशांच्या राजधान्या अवघ्या पावणेतीन मिनिटांत तर २९ सेकंदात भारतातील २९ राज्यांच्या राजधान्या कशाही क्रमाने पाठ असणाऱ्या अजिंक्यच्या उपक्रमाची नोंद घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला सन्मानित केले आहे.
शिंदेवाडी गावातील अजिंक्य अरूण मोरबाळे यांने केलेली अफलातून कामगिरी अभिमानास्पद आहे. अजिंक्यच्या या ग्लोबल विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने घेतली असून त्याला प्रबंध लिहिण्यासाठी आमंत्रण दिले आहे. मुरगूड शहरालगतच्या शिंदेवाडी गावातील अरुण मोरबाळे यांच्या कुटुंबीयांना लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर छत्तीसगडच्या एका मुलीच्या व्हिडीओतून प्रेरणा मिळाली. त्यातूनच अजिंक्यच्या बुद्धिमत्तेचा हा नवा प्रवास सुरू झाला. अवघ्या चार महिन्यांत अजिंक्यचे चुलते कृष्णात मोरबाळे व आई-वडिलांनी त्याचे पाठांतर करून घेतले. सुरुवातीच्या पाठांतरासाठी त्यास साडेचार मिनिटे लागली. पण लवकरच त्याच्या पाठांतराचा वेग वाढला. त्यातूनच त्याच्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने घेतली. आणि प्रत्यक्ष सादरीकरणात अवघ्या पावणे तीन मिनिटांत अजिंक्यने १९५ देशाच्या राजधान्या तर भारतातील २९ राज्यांच्या राजधान्या २९ सेकंदात अचूकपणे सादर केल्या. यापूर्वीचे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधील सर्व विक्रम त्यांने मोडीत काढले. त्यामुळेच त्याच्या नव्या विक्रमाची नोंद इंडिया रेकॉर्डने घेतली.