कातोलीतून ‘अजित’, तर कळेतून संदीप
By admin | Published: January 31, 2017 11:03 PM2017-01-31T23:03:45+5:302017-01-31T23:03:45+5:30
नरके बंधू मैदानात उतरणार : दोन्ही ठिकाणी बंडोबामुळे डोकेदुखी
विक्रम पाटील-- करंजफेण -गेली २० वर्षे आरक्षित असलेला कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघ यावर्षी सर्वसाधारण पुरुष गटासाठी खुला झाल्याने इच्छुकांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेतली आहे. आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांचे नाव कोतोलीसाठी नाव पुढे येत आहे. तर कळेतून काँग्रेसकडून संदीप नरकेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, २०१२ साली या मतदारसंघावर आमदार सत्यजित पाटील गटाने जनसुराज्यशी काटा लढत देऊन वर्चस्व प्राप्त केले होते; परंतु याहीवर्षी जनसुराज्य व शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे; परंतु जनसुराज्यने भाजपशी संधान साधल्याने कोरे यांना सत्तेची ताकद मिळेल. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. एस. चौगले आपला उमेदवार रिंगणात उतरवतील, असे काही दिसत नाही. परंतु, सेनेच्या पाटील गटात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे कोंडी झाली आहे. परवापर्यंत कोरे गटातून शंकर पाटील व सेनेकडून प्रकाश पाटील यांचे नाव पुढे असताना आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांचे सेनेतून नाव कोतोलीच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ लागल्यामुळेच ते आपली राजकारणाची एंट्री कोतोलीतून करण्याचे नाकारता येत नाही. कोतोलीअंतर्गत बाजार भोगाव हा मतदारसंघ नरके यांचा बालेकिल्ला आहे. तसेच अध्यक्षपद खुले असल्याने अजित यांना तेथून उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह दिसत आहे.परंतु, सरूडकर गटाची उमेदवारीसाठी असणारी धडपड व कोतोलीतील स्थानिक उमेदवार प्रकाश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास स्थानिक मतदानावर फरक पडणार का? हा प्रश्न आहे. त्यातच सरूडकर घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते व दत्त कारखान्याचे माजी संचालक दगडू पाटील हे माघार न घेण्याच्या बोलीवर उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे पाटील गटाला डोकेदुखी ठरणार आहे.पाटील यांची उमेदवारी नाकारून नरके यांची उमेदवारी जाहीर झाल्यास प्रकाश पाटील काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री विनय कोरे आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी व गटाची ताकद वाढविण्यासाठी मागीलवेळी बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे समजते. कळेत पी. एन. पाटील यांची इच्छा असल्यास आपण कळे मतदारसंघातून लढणार असल्याचे संदीप नरके यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी आजपर्यंत तरी नक्की मानली जात आहे.
तर कोरे मदत करणार का?
माजी मंत्री कोरे यांनी कार्यकर्त्यांना पी. एन. यांना उघडपणे मदत करण्याचे आदेश दिले असले, तरी करवीरमधून ‘भाजप’चा उमेदवार असल्यास पी. एन. यांना प्रत्यक्ष कोरे यांच्याकडून मदत होणार का? हा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न सुटणारा आहे.
दोन आजी आणि दोन माजी
आमदारांच्या प्रतिष्ठेची लढत
कोतोलीमधून अजित नरके यांना निवडून आणण्यासाठी विद्यमान आमदार सत्यजित पाटील, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांची ताकद पणाला लागणार आहे. तर जनसुराज्यचे उमेदवार शंकर पाटील यांना निवडून आणण्यासाठी माजी मंत्री विनय कोरे व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची ताकद पणाला लागणार आहे.