कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या ८५ दिवसांपासून कोल्हापूर शहरातील सर्व सराफ दुकाने बंद आहेत. आता यापुढे दुकाने बंद ठेवणे व्यावसायिकांना परवडणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सोमवारी (दि. २८) आम्ही सर्व सराफ बाजार, दुकाने सुरू करणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी गुरुवारी दिली.
गेल्या तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या बैठकीत सराफ व्यावसायिकांची अडचण मांडली आहे. गेल्या ८५ दिवसांपासून सराफ दुकाने बंद आहेत. यापुढे आता दुकाने बंद ठेवणे आम्हा व्यावसायिकांना परवडणारे नाही. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या कमी होत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी कमी होईल, असे वाटते. शासनाचे निर्बंध, नियमांचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पाळून सोमवारपासून सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत कोल्हापूर शहरातील सर्व सराफ दुकाने सुरू असतील. ग्राहकांनी देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि धंद्यात तेजी-मंदी ग्रुपच्यावतीने सोमवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. संघाच्या महाद्वार रोड येथील इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. संघाच्या सभासदांसह इतरांनी देखील या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.