तानाजी घोरपडे ।हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या १३ डिसेंबर रोजी होणाºया पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरपरिषदेवर निर्विवाद बहुमत प्राप्त करण्याबरोबरच सत्तासुंदरीला आपलंसं करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोहीम उघडली आहे. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (आवाडे गट) व भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीमध्ये सावध पवित्रा घेत योग्य व सर्वमान्य उमेदवाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेनेने सर्वप्रथम आघाडी घेत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या पत्नी विमल जाधव यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करून प्रचारासही सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून हुपरी शहरावर निरंकुश सत्ता गाजविणाºया राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची अवस्था सध्या अत्यंत केविलवाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केवळ एक-दोन जागेच्या मोबदल्यात या पक्षाचे स्थानिक नेते आज कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना जिल्हा व राज्य स्तरावरील एकाही पदाधिकारी किंवा नेत्यांचे पाठबळ मिळत नसल्याने शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हवालदिल झाले असून कार्यकर्त्यांमध्ये सरळसरळ उभी फूट पडली आहे.
यापैकी एक गट भाजपाच्या दारात व दुसरा गट माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या दारात उभा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशीच अवस्था मनसेची झाली असून या पक्षाने सध्या ‘वेट अँड वॉच’धोरण अवलंबले असल्याचे पहावयास मिळत आहे.
रौप्यनगरीचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान आरक्षणाने सर्वसाधारण महिला प्रवर्गाला मिळाला आहे. शहरात सध्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी व भाजपाचे जोरदार वारे वाहू लागले आहे. प्रामुख्याने या दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्याच हाती ठेवली आहेत.
नगरपरिषदेवर आपली एकहाती सत्ता आणण्यासाठी अत्यंत सावध पवित्रा घेत युती-आघाडी करताना आपला एकही कार्यकर्ता दुखावला जाणार नाही याबाबतची जाणीवपूर्वक काळजी घेत आहेत. याउलट भाजपाच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची वर्तणूक पहावयास मिळत आहे. हुपरी जिल्हा परिषद तसेच रेंदाळ व यळगूड ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षाला मिळालेले यश स्थानिक नेत्यांच्या डोक्यात शिरल्याने ही निवडणूकही आपणच जिंकणार या अविर्भावात ते निवडणूक यंत्रणा राबवित असल्याचे पहावयास मिळत आहे. युती, पक्ष प्रवेश, उमेदवारीचे निर्णय येथील स्थानिक दोन नेते परस्पर घेत असल्याने पक्षाचे कार्यकर्ते हतबल व हवालदिल झाले आहेत.शिवसेनेमध्ये गटबाजीचे दर्शन१ शहरात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा असून साधारण चार -साडेचार हजार एक गठ्ठा मताचे त्यांचे पॉकेट कायम टिकून आहे. मात्र, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे शहराकडे झालेले दुर्लक्ष व शिवसैनिकांना काही पक्ष कार्यक्रमच दिला जात नसल्याने सध्या शिवसैनिक सुस्तावला आहे. जिल्हाप्रमुख जाधव सोडल्यास शिवसेनेत एकही वजनदार पदाधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ता दिसत नाही.२ आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख जाधव यांच्यातील मतभेद तसेच शहर शिवसेनेकडे आमदार मिणचेकर यांनी केलेले दुर्लक्ष या सर्व गोष्टी शिवसेनेला कायमच बॅकफुटवर घेऊन जात आहेत. परिणामी मतांचे इतके मोठे हक्काचे पॉकेट हातात असतानाही शिवसेनेला एकही स्थानिक निवडणूक जिंकता येत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.