लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : येत्या सहा महिन्यात कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व क्रीडा सुविधा एकाच ठिकाणी असलेलं कसबा बावडा पॅव्हेलियन क्रीडांगण हे पहिलं क्रीडांगण असेल. तसेच तलवारबाजी खेळाला या जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या खेळासाठीच्यादृष्टीने अद्ययावत सुविधांनीयुक्त तलवारबाजी व बॉक्सिंग हॉल उभा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी केले.
कसबा बावडा पॅव्हेलियन क्रीडांगणासाठी पालकमंत्री पाटील यांनी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी ५९ लाख रुपये खर्चाच्या तलवारबाजी व बॉक्सिंग हॉलच्या पायाभरणी समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधरे, सचिव उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनय जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, क्रिकेट, बॉक्सिंग, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, जलतरण तलाव, बॅडमिंटन अशा अनेक क्रीडा प्रकारांची सुविधा क्रीडांगणावर करण्यात येत आहे. तसेच दिव्यांगांसाठी सुद्धा स्वतंत्र हॉल बांधण्यात आला आहे. येत्या काळात दहा हजार खेळाडूंना या ठिकाणच्या क्रीडा सुविधा उपयोगात आणता येतील.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, बावड्यातील गावमाळाचा कायापालट करण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत. या ठिकाणी अनेक प्रकारच्या क्रीडा सुविधा आपण उपलब्ध करत आहोत. त्यामुळे राज्यस्तरावरील सामने या ठिकाणी भविष्यात घेता येतील व कोल्हापूरच्या सर्व खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक करता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोढे, दीपक घोडके, विलास वाघ, पांडुरंग रणमाळ, प्रशांत जगताप, राजू शिंदे, पद्माकर जगदाळे, स्वप्नील तांगडे, तुषार आहेर, प्रफुल्ल धुमाळ, दीपक क्षीरसागर आदी तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, संदीप नेजदार, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती हरी पाटील, संतोष पाटील, गजानन बेडेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक उदय डोंगरे यांनी केले, तर सूत्रसंचालन विलास पिंगळे यांनी केले.
फोटो कॅप्शन १२
कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावरील तलवारबाजी व बॉक्सिंग हॉलचा पायाभरणी समारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आ. ऋतुराज पाटील, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधरे, सचिव उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनय जाधव आदी उपस्थित होते.
--------------------------------------------