* ग्रामपंचायतीमध्ये धुमशान :
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्याविरोधात देसाई गट, नरसिंगराव गट आणि शिवसेना व काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोगण गटासमोर कडवे आव्हान असणार आहे.
२००० पासून येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे अशोकराव देसाई यांच्या गटाची सत्ता होती. दरम्यान, भोगण यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे गेल्यावेळी तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी देसाई व भोगण यांना एकत्र लढण्याचा सल्ला दिला होता.
चौरंगी सामन्यात ११ पैकी देसाई व भोगण यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम विकास आघाडीला ६ जागा (देसाई व भोगण गटाला प्रत्येकी ३) मिळाल्या. विरोधी नरसिंगराव गटाला ४ जागा मिळाल्या, तर १ अपक्ष निवडून आला. भरमू पाटील गट व शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.
निवडणुकीनंतर भोगण यांनी देसाई गटाशी फारकत घेऊन नरसिंगराव गटाशी हातमिळवणी केली. पत्नी अनिता यांना सरपंचपदी आणि नरसिंगराव गटाच्या विष्णू आढाव यांना उपसरपंचपदी बसवून ग्रामपंचायतीची सूत्रे आपल्याकडे घेतली.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत भोगण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्याविरोधातील भाजपाचे शिवाजीराव पाटील यांना, तर देसाई गटाने राजेश पाटील यांना ताकद दिली. त्यामुळे देसाई यांच्या नेतृत्वाखाली भोगणविरोधी आघाडीला आमदार पाटील यांची ताकद मिळण्याची शक्यता आहे. कोण कुणाबरोबर जाणार, यावरच सामन्यातील चुरस व रंगत अवलंबून आहे.
-----------------------------------
* देसाई गट उट्टे काढणार..!
देसाई गटाला सरपंचपद आणि भोगण गटाला उपसरपंचपद देण्याचे गेल्यावेळी ठरले होते. परंतु, पत्नीच्या सरपंच पदासाठी भोगण यांनी नरसिंगराव गटाशी हातमिळवणी केल्यामुळे देसाई गट दुखावला गेला. त्याचे उट्टे या निवडणुकीत निघण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
* भोगण यांचीही मोर्चेबांधणी
राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेवर गेलेल्या भोगण यांनी ताराराणी आघाडीला पाठिंबा देऊन मतदारसंघासह कोवाडसाठी भरीव निधी खेचून आणला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकहाती सत्तेसाठी त्यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्याबरोबरच बिनविरोधसाठीही सहकार्याची भूमिका त्यांनी ठेवली आहे.
-----------------------------------
* प्रभाग : ४
* जागा : ११
* मतदार : २९५०