लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पोंबरे (ता. पन्हाळा ) येथे वानरमारी समाज पारंपरिक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करीत आहे. गावापासून सुमारे अडीच-तीन किलोमीटरवर जंगलात त्यांची वस्ती आहे. झोपड्या बांधून तिथे सहा कुटुंबे वास्तव्यास आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ मित्तल यांनी या वस्तीला भेट दिल्याने वानरमारी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पोंबरे येथील जंगलक्षेत्रात राहणारे वानरमारी हे आदिवासी बांधव अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. वनविभागाच्या कडक नियमांमुळे त्यांना जंगलातील औषधी वनस्पती, मध काढून विक्री करण्यात अडचणी येत असल्यामुळे मिळेल तिथे रोजगार करून गुजराण करावी लागत आहे. त्यांना स्वतःची गुंठाभरही जमीन नाही. परिसरात एखाद्याच्या शेतावर मजुरी करायची नाहीतर अगदी कोकणात आंबे तोडण्याचे, काजु गोळा करायचे कामही हे लोक करीत आहेत. शासनाच्या योजना या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे हा समाज स्वावलंबी बनण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.
जंगलक्षेत्रात सरकारी मुलकीपड जमिनीत झोपड्या बांधून वानरमारी समाज राहिला आहे. त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वतः या वानरमारी समाजाच्या वस्तीला भेट दिली होती. त्यांच्या पाठोपाठ गुरुवारी मित्तल यांनी भेट दिली. शासनाने कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी जमीन व राहण्यासाठी पक्की घरे मिळणेविषयी या समाजाने अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी मित्तल यांनी कुटुंबातील लहान मुलांची चौकशी करून अंगणवाडीमार्फत त्यांना पोषण आहार देणेबाबत सूचना केल्या.
यावेळी गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सहा. गटविकास अधिकारी एस. एस. सावंत, विस्तार अधिकारी पी. डी. भोसले, पी. एस. सूर्यवंशी. अमित विचारे, ग्रामसेवक सारिका कुंभार, ग्रामसेवक दीपक इंगवले, रामकृष्ण वाघमारे, पोपट जगताप, अनिल गर्कल, तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी शरद पोवार, प्रकाश पाटील, बबन कातळे, आदी उपस्थित होते.