अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:37 AM2017-08-24T00:37:31+5:302017-08-24T00:37:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्यावतीने इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज केले जाईल की वर्षभरात त्याचा ‘स्वतंत्र अहवाल’ छापावा लागेल, असा ‘शब्द’ही त्यांनी यावेळी दिला.
महेश जाधव यांची देवस्थान अध्यक्षपदी व वैशाली क्षीरसागर यांनी कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन समितीची विविध प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी,
अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.
जाधव म्हणाले, समितीच्या अखत्यारित एकूण तीन हजार बेचाळीस मंदिरे असून, दहा हजार ४९२ हेक्टर इतकी जमीन आहे. जमिनींची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असून, जमिनीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही बसविले जाणार असून, दोन महिन्यांतून एकदा बैठक घेतली जाणार आहे. विविध सामाजिक कामांसाठीही समिती निधी खर्च करणार असून, समितीच्यावतीने अन्नछत्र व भक्त निवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंदिर परिसरात एकही जाहिरात लागणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल. मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय त्र्यंबोली मंदिर परिसर विकास आराखडाही प्रस्तावित आहे.
खजानिस वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, समितीतील भ्रष्टाचाराबाबत सध्या चौकशी सुरू आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही.
भक्त निवासापासून भाविकांना मोफत बसेससाठी प्रयत्न केले जातील, तसेच अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठीही समितीचा आग्रह राहील हा निर्णय झाला तर ‘देवस्थान’सह कोल्हापूरचा विकास होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सचिव विजय पोवार म्हणाले, सन २००७ ते २०१२ या कालावधीतील लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात आहे. देवस्थान अस्तित्वात येण्यापूर्वीचे ताळेबंद नाहीत. ते तयार करण्याचे आदेश शासनाने दिले असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.
‘देवस्थान’कडील दागिने
समितीच्या अखत्यारितीतील मंदिरात आजअखेर ८६ हजार २१ ग्रॅम इतके सोन्याचे, तर २४ लाख २४ हजार ९६१ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण झाले आहेत.
त्यापैकी ४७ हजार ९८४ ग्रॅम सोने व ९ लाख २६ हजार ४७१ इतकी चांदी एकट्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे आहेत. त्याचे रितसर मूल्यांकन झाले आहे.
एकूण ठेव सुमारे १०७ कोटींची आहे. आजअखेर एकूण उत्पन्न १३९ कोटी ८९ लाखांचे आहे. एप्रिल २०१७ पासून ३७ लाख खंड वसुली झाली आहे. त्याशिवाय सर्व मंदिरांत मिळून एकूण ३६ दानपेट्या आहेत.
लोगोसाठी आवाहन
देवस्थान समितीचे अधिकृत बोधचिन्ह बनविण्यासाठी (लोगो) बोधचिन्ह स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह करणाºया व्यक्ती अथवा संस्थेला एकवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार असून, इच्छुकांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.