अंबाबाईच्या सुवर्ण पालखी निर्मितीला प्रारंभ
By admin | Published: April 22, 2015 12:01 AM2015-04-22T00:01:44+5:302015-04-22T00:32:52+5:30
अंबाबाईसाठी साकारण्यात येणाऱ्या या पालखीसाठी भाविकांनी यथाशक्ती सहकार्य करावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या सुवर्ण पालखीच्या प्रत्यक्ष निर्मितीला अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारपासून शुभारंभ करण्यात आला. वाय. पी. पोवार नगरमधील रतन सूर्यवंशी यांच्या सूर्यवंशी इंडस्ट्रीजमध्ये ही सुवर्ण पालखी कलात्मकरित्या मढविण्यात येणार आहे. प्रारंभी जमा झालेल्या सोन्याची विधीवत पूजा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाली. त्यानंतर हे सोने उच्चदाबाच्या विद्युत भट्टीमध्ये वितळवण्यात आले. सुवर्ण कारागिर गणेश चव्हाण यांच्यासह १० सहकारी ही पालखी घडवणार आहेत. अंबाबाईसाठी साकारण्यात येणाऱ्या या पालखीसाठी भाविकांनी यथाशक्ती सहकार्य करावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी भरत ओसवाल, समीर सेठ, महेंद्र इनामदार, दत्तम इंगवले, जितेंद्र पाटील, शिवप्रसाद पाटील, दीपक ओतारी, गिरीष कागलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)