कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे. तिरुपती देवस्थानकडून २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीची पोलखोल झाल्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.दस-यादिवशी तिरुपतीहून येणारा शालू नव्हे तर समितीतर्फे देण्यात येणारे महावस्त्रच अंबाबाईला नेसविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी दिली. तिरूपती देवस्थानच्या वतीने शालू आलाच तर त्याची कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही किंवा डामडौल होणार नाही.>निर्णय का ?तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई म्हणजेच तिरुपतीची पत्नी या नात्याने १९८३ पासून शालू पाठविला जात होता. मात्र, अंबाबाई ही आदिमाता असून ती तिरुपतीची पत्नी नाही, हे सांगणारी वृतमालिका ‘लोकमत’ने दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या पद्धतीला विरोध होऊ लागला होता. गतवर्षी आईला शालू पाठवतोय, असे सांगून तिरुपती देवस्थानने हा शालू पाठविला होता. अंबाबाईला घागरा चोली वेष परिधान केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला. लोकभावनेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे समजते.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी अंबाबाईला तिरूपतीचा शालू नेसवणे बंद होणार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 5:45 AM