केंद्र सरकारने कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या प्रमुख मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी येथील प्रांत कचेरीवर धडक मारली. केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणांनी शहर दणाणून गेले.
शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मी रोड, अहिल्यादेवी होळकर चौक ते प्रांत कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
तत्पूर्वी, लक्ष्मी मंदिरात झालेल्या सभेत अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक व नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चाने जाऊन प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, तालुकाध्यक्षा राजश्री बाबन्नावर, उपाध्यक्षा सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मंजुळा कोरवी, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत, माधवी देसाई, रेणुका शिरगावे, दीपाली पाटील, मुमताज कदीम आदींसह अंगणवाडीसेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
आशा सेविकांचाही मोर्चा
दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील आशा सेविकांनीही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील दसरा चौकातून पंचायत समितीवर मोर्चा काढला.
मोर्चात सिटूप्रणित आशा सेविका संघटनेचे पदाधिकारी व सेविका सहभागी झाल्या होत्या.
चौकट :
प्रमुख मागण्या अशा
जिल्हावार बैठका घेऊन दैनंदिन समस्यांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढा, मिनी अंगणवाड्यांचे पूर्ण अंगणवाडीत रूपांतर करा, प्रशासनाकडे जमा केलेले मोबाईल परत घेण्यासाठी दबाव आणू नये, त्या बदल्यात चांगल्या दर्जाचा टॅब द्यावा, सदोष पोषण आहार ट्रॅकर अॅपची सक्ती मागे घ्यावी. त्याऐवजी मराठी भाषेतील सुलभ अॅप द्यावा, थकीत प्रवास व बैठक भत्ता द्यावा, किरकोळ खर्चाची सादील रक्कम ५ हजार करावी, अंगणवाडी भाडे इमारत वाढवावी, पोषण आहाराचे केंद्रीकरण न करता ते काम स्थानिक महिला बचत गटांना द्यावे.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे अंगणवाडी सेविकांतर्फे प्रांत कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात बाळेश नाईक, स्वाती कोरी, अंजना शारबिद्रे, अंगणवाडीसेविका व मदतनीस सहभागी झाले होते. दुसऱ्या छायाचित्रात आशा सेविकांनी पंचायत समितीवर काढलेला मोर्चा. (किल्लेदार फोटो)
क्रमांक : २४०९२०२१-गड-०४/०५