याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री एक पोलीस अधिकारी व कर्मचारी दानोळी येथे निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी अचानक एका महिला उमेदवाराच्या घरात जाऊन तुम्ही एकत्र का बसला आहात, असे म्हणून त्यांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माने कोपऱ्यावरील आणखी एका महिलाने उमेदवाराच्या घरासमोर जाऊन तेथील बसलेल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत अनेक कार्यकर्ते एकत्र झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी याचा जाब विचारण्यास सुरुवात केली असता पोलीस गाडी शिवाजी चौकाकडे गेली, पण थोड्याच वेळात या मार्गावर पोलीस गाडी पुन्हा येऊन एका उमेदवाराच्या घरासमोर थांबली आणि पुन्हा अशीच दमदाटी करण्यास सुरुवात केली. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस व अधिकाऱ्याच्या अशा वर्तनाने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, शुक्रवारी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याचे समजते. त्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नेतेमंडळींबरोबर चर्चा देखील केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत न्याय मागण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचे समजते.
दानोळीत ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांबाबत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:29 AM