कोल्हापूर : लेखापरीक्षकांच्या शेऱ्याला केराची टोपली दाखवीत विनाटेंडर टॅँकर घेऊन त्यांना जादा भाडे देणाऱ्या टॅँकरचे मालक कोण आहेत, हे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षांनी सांगावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पत्रकातून केले आहे. शासनाच्या परवानगीने कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना कर्ज दिले का? चाफकटर खरेदी केलेल्या व्यक्तीचे संघाच्या कोणत्या नेत्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. पाटील यांनी ‘गोकुळ’च्या दुधाला प्रश्नोत्तराने उकळी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पत्रकातून अध्यक्षांनी पहिल्या पाच प्रश्नांची दिलेली उत्तरे चुकीची असल्याचा दावा करत, नवीन दहा प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत दूध विक्री करणारी कोल्हापूर आईस फॅक्टरी कोणाची आहे? या फॅक्टरीचे वाहतुकीसाठी किती टॅँकर्स आहेत? त्यांना किती भाडे मिळते? दूध विक्रीतून फॅक्टरीला किती कमिशन मिळते? व्यंकटेश्वरा गुडस्च्या नावे किती टँकर आहेत? आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. कार्यक्षेत्राबाहरील दूध खरेदी केल्याने झालेला तोटा अनवधानाने चुकीचा दाखविल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे. मग लेखापरीक्षणातील माहिती खोटी आहे काय? काटकसर करतो म्हणता तर संचालकांच्या गाड्या का बंद करत नाहीत? वाहतूक भाडे प्रतिलिटर १ रुपये ५५ पैसे आहे; पण ‘वारणा’ दूध संघाचे १ रुपये ५ पैसे आहे. टोल वाढवूनही प्रतिलिटर २० ते २६ पैसे जादा भाडे दिसते. जादा वाहतूक भाडे देणारे टॅँकरमालक नेमके कोण आहेत, हे जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)सतेज पाटील यांचे प्रश्न मुंबईत दूध विक्री करणारी कोल्हापूर आईस फॅक्टरी कोणाच्या मालकीची आहे? या फॅक्टरीचे वाहतुकीसाठी किती टॅँकर्स आहेत? त्यांना किती भाडे मिळते? दूध विक्रीतून फॅक्टरीला किती कमिशन मिळते?व्यंकटेश्वरा गुडस्च्या नावे किती टँकर्स आहेत?वर्षाचे किती वाहतूक भाडे मिळते?टॅँकरचे टेंडर प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार का?जादा दराने चाफकटर खरेदी केले, त्या मालकाचे कोणत्या नेत्यांबरोबर मैत्रीचे संबंध आहेत? बल्क कुलर दुग्ध विभागाच्या परवानगीने कार्यक्षेत्राबाहेर बसविली आहेत का?महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचा चार कोटी ७२ लाख व्यापारी नफा असताना १६ हजार ९१८ रुपये निव्वळ तोटा कसा?संघाचे काही बॅँकांच्या चालू खात्यावर व्यवहार सुरू आहेत, या बॅँकांचा आॅडिट वर्ग, ‘एनपीए’ किती आहे?मग टॅँकर शिरोलीत थांबणार नाहीत!शासनाकडून रॉकेल पुरवठा करणाऱ्या टॅँकरवर, दुष्काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरवरसुद्धा जीपीएस यंत्रणा बसविली जाते. ही यंत्रणा संघाच्या टॅँकरवर का नाही? ज्यामुळे टॅँकर शिरोली अथवा अन्य कोणत्या ठिकाणी थांबणार नाहीत.
टँकरमालकांची नावे जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 12:32 AM