दिवाणजी, ओएसडी यादव यांच्याशिवाय पालकमंत्री पाटील यांचे पानही हलत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:36 AM2019-07-13T00:36:29+5:302019-07-13T00:37:07+5:30
सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली.
कोल्हापूर : दिवाणजी आणि ओएसडी बाळासाहेब यादव यांच्याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पानही हलत नाही, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत असाच आरोप केल्यानंतर पुन्हा मुश्रीफ यांनी पुनरुच्चार केल्याने हे दोघेही आता चर्चेत आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्तीच्या निधीवरून सुरू असलेल्या वादाबाबत जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडून पालकमंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांचा उल्लेख झाला. तेव्हा हसन मुश्रीफ उसळून म्हणाले, यादव म्हणजे काय पालकमंत्री आहेत काय, यादी द्यायला. त्यांच्याशिवाय आणि दिवाणजींशिवाय पालकमंत्र्यांचे पानही हलत नाही. येथील कावळा नाका रेस्ट हाऊसवरून यादवच सर्व सदस्यांना निधीबाबत फोन करतात, असाही मुद्दा यावेळी चर्चेतून पुढे आला.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांनी मंत्री पाटील यांच्यावर थेट आरोप करताना असाच आरोप केला होता. सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली.
कोण आहेत हे दोघे
महसूल खात्यामध्ये तलाठी म्हणून काम करणारे प्रकाश शिंदे यांना ‘दिवाणजी’ म्हणून ओळखले जाते. ते राधानगरी तालुक्यातील सावर्डे-पाटणकर गावचे आहेत. त्यांना १५ वर्षांपूर्वी लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यातूनच त्यांना निलंबितही करण्यात आले होते. त्याच काळामध्ये त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार असताना संपर्क आला. गेली साडेचार वर्षे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विविध शासकीय कामांचे व्यवस्थापन ते पाहतात, असे सांगण्यात येते. पांढरी इनोव्हा गाडी घेऊन फिरणारे ‘दिवाणजी’ मुंबईपर्यंत चर्चेत आले आहेत.
बाळासाहेब यादव हे गेली साडेचार वर्षे मंत्री पाटील यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहेत. ते सहकार विभागातील आॅडिट विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. मंत्री पाटील यांच्या कावळा नाका येथील संपर्क कार्यालयाचा कार्यभार त्यांच्याकडे असून, सर्व प्रशासकीय कामकाज त्यांच्यामार्फत होते. जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाच्या याद्या यादव यांनी तयार केल्याच्या आरोपामुळे ते चर्चेत आले आहेत.