कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आलेले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. घटनादुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, हे सुप्रीम कोर्टाला पटवून देण्यात महाराष्ट्राचे आघाडी सरकार अपयशी ठरल्याचीही टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्याला संबोधित केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यावर टीकास्त्र चालवले. पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी या सरकारला अपयश आले आहे, ते अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचा हास्यास्पद व केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांच्या विधानाला मराठा समाज कधीही भुलणार नाही. १०२ च्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, हे सुप्रीम कोर्टाला योग्य पध्दतीने पटवून देता आले नाही. हायकोर्टाला आरक्षण पटवून देण्यात आपण यशस्वी ठरलो होतो. आरक्षणाचा कायदा अगोदरचाच आहे. त्यामध्ये फक्त दुरुस्ती होती. त्याबाबत संयुक्त चिकित्सा समितीने राज्याचे अधिकार अबाधित ठेवल्याची सूचना दिली होती. ते सरकारने मान्यही केले होते. मग सुप्रीम कोर्टात ते पटवून दिले पाहिजे होते. १९४७ पासून २०१८ पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यात ते आरक्षण देऊ शकले असते, त्यांना आरक्षण द्यायचेच नव्हते. आज सत्तेसाठी आरक्षण न देण्याच्या काँग्रेसच्या छुप्या अजेंड्याला शिवसेना साथ देते ही शोकांतिका आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या या सरकारचा मी निषेध करतो. भाजपने दिलेले आरक्षण तुम्हाला टिकवता आले नाही, असेही ते म्हणाले.