यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवा
By Admin | Published: June 27, 2016 10:33 PM2016-06-27T22:33:25+5:302016-06-28T00:38:35+5:30
‘आयटक’ची मागणी : प्रांत कार्यालयावर मोर्चा
इचलकरंजी : शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी, अशा मागणीसाठी करवीर कामगार संघ-आयटकच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सचिन हाके यांना निवेदन दिले.
कामगार संघटनेच्या गोकुळ चौकातील कार्यालयापासून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व शंकर पुजारी, हणमंत लोहार, मारुती आजगेकर यांनी केले. मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर प्रवेशद्वारावर तो पोलिसांनी अडविला. निवेदन दिल्यानंतर शंकर पुजारी, शंकर आडावकर, मारुती आजगेकर, हणमंत लोहार, आदींची भाषणे झाली. शासन कामगारांच्या घरकुल, आरोग्य विमा, कामगार कल्याण मंडळ अशा योजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल वक्त्यांनी टीका केली.
मोर्चासमोर बोलताना पुजारी म्हणाले, यंत्रमाग कामगारांबरोबर जॉबर, दिवाणजी, कांडीवाले, सायझर, वार्पर, हेल्पर, फायरमन, वहिफणी, कामगार, आॅटोलूम कामगार, गारमेंट व प्रोसेसिंग उद्योगातील कामगार अशा सर्वांनाच शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा. मालेगाव महापालिकेप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेने कामगारांच्या घरकुल योजनेबाबत सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारीत करावा. लक्ष्मण चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)