कोल्हापूर: राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे. या टोल वसुलीमध्ये जमा होणाऱ्या रकमेचे पुढे काय होते, हाच मोठा झोल आहे. यामुळे राज्यातील टोल वसुलीची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाच्या दरम्यान केली. आमदार आबिटकर म्हणाले, सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे येथील टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोल वसुली होत आहे.
या दोन्ही टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी २० वर्षांची मुदत होती. या टोल नाक्यावर एकूण ३ हजार २४५ हजार कोटी खर्चापैकी आजपर्यंत १,९०२ हजार कोटी रुपयांची वसुली झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, किती टोल वसूल झाला, याबाबत कोणतेही मोजमाप करणारी यंत्रणा नसल्यामुळे टोल नाके म्हणजे लुटीची केंद्रे झाली आहेत.यावेळी उत्तर देताना बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यातील टोल वसुलीसंबंधी अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल.