महापुराचा अभ्यास करण्यासााठी समिती नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:05+5:302021-09-25T04:24:05+5:30
कोल्हापूर : महापूर परिस्थितीचा अभ्यास व पूरनियंत्रणाच्या उपायांचा शास्त्रीय अहवाल तयार करण्यासाठी समिती नेमावी, या समितीने पूरग्रस्तांशी संवाद साधून ...
कोल्हापूर : महापूर परिस्थितीचा अभ्यास व पूरनियंत्रणाच्या उपायांचा शास्त्रीय अहवाल तयार करण्यासाठी समिती नेमावी, या समितीने पूरग्रस्तांशी संवाद साधून याेग्य सूचनांचा समावेश करत अंतिम अहवाल सादर करावा, यासह पूरग्रस्त गावांचे १३० हून अधिक ठराव शुक्रवारी पूरग्रस्त समितीतर्फे बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली.
महापुरामुळे अनेक गावांतील नागरिकांची घरे, शेती, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, दरवर्षी हा धाेका कायम राहणार आहे. हा मानवनिर्मित चुकांचा परिणाम असल्याचे दाखवून देत गावांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती. गंभीर होत चाललेल्या पूरस्थितीबाबत गावकऱ्यांशी चर्चा करून गावच्या ग्रामपंचायतींच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेऊन निर्णयाअंती मांडलेले ठराव जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अभ्यास समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम तातडीने सुरू करावे, पुराच्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळा आणणाऱ्या रस्त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचे काम सुरू करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणत्याही रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी जलसंपदा विभागाची परिचलनबाबतची शिफारस घेणे बंधनकारक करावे, असे १३० हून अधिक ठराव यावेळी देण्यात आले.
शिष्टमंडळात खाडे यांच्यासह, वाठार तर्फ उदगावचे सरपंच शंकरराव शिंदे, खाटांगळेचे सरपंच सतीश नाईक, चिंचवडेचे सरपंच युवराज कांबळे, पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर, शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे, पुनाळचे सरपंच युवराज पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
फोटो नं २४०९२०२१-कोल- पूरग्रस्त समिती
ओळ :
कोल्हापुरातील पूरग्रस्त समितीच्या वतीने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना पूरग्रस्त गावांचे ठराव देऊन पुराच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली.
----