कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 11:48 AM2022-10-03T11:48:47+5:302022-10-03T11:49:15+5:30

कार्यकर्त्याला संधी द्यायची की नेत्याला, याचा पेच नेतृत्वासमोर राहणार

Appointment of Government appointed member Muralidhar Jadhav in Gokul cancelled | कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस

कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस

Next

कोल्हापूर : राज्यातील सत्तांतराचे पडसाद ‘गोकुळ’मध्येही उमटले असून, शासन नियुक्त सदस्य मुरलीधर जाधव यांची नियुक्ती राज्य शासनाने रद्द केली आहे. या ठिकाणी खासदार धैर्यशील माने यांचे समर्थक झाकीरहुसेन बाबासाहेब भालदार (माणगाव) तर खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांची शिफारस करण्यात आली आहे. भालदार यांच्या नावावर दुग्धविकास मंत्र्यांची शिफारस असल्याने दोघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

गोकुळ’मध्ये दीड वर्षापूर्वी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी सत्तांतर केले. त्यानंतर शासन नियुक्त म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची थेट नियुक्ती केली होती. नियुक्ती करूनही पाच-सहा महिने जाधव यांना संचालक मंडळावर घेतले नव्हते. अखेर चार महिन्यांपूर्वी जाधव कार्यरत झाले. तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाले आणि त्याचे पडसाद ‘गोकुळ’च्या सत्तेत उमटणार, हे निश्चित होते. जनसुराज्य, शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तांतर करता येईल का? याची चाचपणी विरोधकांनी केली होती. मात्र, त्यात यश येणार नसल्याने त्या हालचाली मंदावल्या.

त्यानंतर शासन नियुक्त पदावरून बाजूला करून खासदार धैर्यशील माने यांनी मुरलीधर जाधव यांच्यासह शिवसेनेला झटका दिला. आता, शासन नियुक्त पदासाठी शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, १४ सप्टेंबरला झाकीरहुसेन भालदार यांची शिफारस करत खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र सादर केले. तर आठवड्यापूर्वी ‘गोकुळ’च्या गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले वीरेंद्र मंडलिक यांच्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबीटकर यांनी ताकद लावली आहे.

‘कार्यकर्ता की नेता’ नेतृत्वापुढे पेच

झाकीरहुसेन भालदार हे सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता गेली २५ वर्षे खासदार माने यांच्यासोबत आहेत, मुरलीधर जाधव हे हातकणंगले तालुक्यातील असल्याने त्यांनाच संधी द्यावी, असा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला संधी द्यायची की नेत्याला, याचा पेच नेतृत्वासमोर राहणार आहे.

भाजपकडून इंगवले यांचे प्रयत्न

भाजपकडून इंगवले यांचे प्रयत्न ‘गोकुळ’ शासन नियुक्त पदावरून धैर्यशील माने व संजय मंडलिक यांच्यात चुरस सुरू असतानाच आता भाजपनेही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांचे नाव दामटले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद त्यांना देता न आल्याने येथे पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Web Title: Appointment of Government appointed member Muralidhar Jadhav in Gokul cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.