कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट्स लावण्याचे काम दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण करणे. अतिरिक्त ६४ एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया विहित कालावधी निश्चित करून पूर्ण करण्याचा निर्णय बुधवारी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासमवेतच्या संयुक्त बैठक घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
दिल्लीतील विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला मी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळ येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी नाईट लँडिंग, धावपट्टी विस्तारीकरण, कार्गो हबची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर अडचणी आणि त्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर विमानतळासंदर्भात आज दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन श्री अनुज अग्रवाल व विमानतळ प्राधिकरण नियोजन समितीचे सदस्य श्री अनिलकुमार पाठक यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री श्री सतेज पाटील हेदेखील उपस्थित होते.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 17, 2021
... pic.twitter.com/LXGyICDJZy
सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १३७० मीटर लांबीची आहे. ही धावपट्टी २३०० मीटर पर्यंत वाढविण्यासाठी लागणारी ६४ एकर जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया विहीत कालावधी ठरवून पूर्ण करणे. त्यापूर्वी १९०० मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी आणि नाईट लँडिंगसाठी लागणाऱ्या अँप्रोच लाईटसची उभारणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.