जावयाचा सासुरवाडीत सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:04+5:302021-07-20T04:19:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील लालनगरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने भावासह शस्त्रास्त्र घेऊन दहशत माजवत आजी सासूसह एका तरुणावर ...

Armed attack on Javaya's father-in-law | जावयाचा सासुरवाडीत सशस्त्र हल्ला

जावयाचा सासुरवाडीत सशस्त्र हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील लालनगरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने भावासह शस्त्रास्त्र घेऊन दहशत माजवत आजी सासूसह एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये नंदा महादेव वाजंत्री (वय ५५) व शुभम ऊर्फ ऋषी विजय तारळेकर (२४, दोघे रा. लालनगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा तिघांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अजय देसाई, पंकज देसाई, भैया देसाई (सर्व रा. वेताळ पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वेताळ पेठ परिसरातील अजय देसाई आणि नंदा यांची नात वैष्णवी यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यातून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादाच्या रागातून अजय देसाई, त्याचे भाऊ भैया व पंकज देसाई हे सोमवारी दुपारच्या सुमारास वाजंत्री यांच्या घरासमोर हातात तलवार व कुऱ्हाड घेऊन आले. त्यांनी दहशत माजवत वाजंत्री यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी नंदा, सून व नात या तिघी घराबाहेर आल्या. नंदा यांनी देसाई यांना जाब विचारला. त्यावर अजय याने सीमकार्ड देणार की नाही, असा सवाल केला. त्याला नंदा यांनी नकार दिल्याने चिडलेल्या अजय देसाई याने तलवारीने नंदा वाजंत्री यांच्या पायावर वार केला. तेथून जात असताना त्याच गल्लीत राहणाऱ्या शुभम तारळेकर याच्यावर अजय याने तलवारीने, तर पंकज याने कुऱ्हाडीने हातावर वार केला. या हल्ल्यात नंदा व तारळेकर हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस ठाण्याजवळच घटना

हाकेच्या अंतरावर असलेल्या गावभाग पोलीस ठाण्याजवळ भरदिवसा तलवार व कुऱ्हाडीने दहशत माजवून दोघांवर वार केले. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तरीही पोलिसांना संशयित सापडले नाहीत. तसेच रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

Web Title: Armed attack on Javaya's father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.