गोकुळ निवडणुकीसाठी ४०० पोलिसांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:24 AM2021-05-01T04:24:04+5:302021-05-01T04:24:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या उद्या, रविवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडकोट ...
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या उद्या, रविवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात चारशेहून अधिक कर्मचारी अधिकारी ७० मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. ही निवडणूक शांततेत पार पडावी. याकरीता ही पोलीस दलाने खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. यापूर्वी ३५ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात वाढ करून मतदान केंद्रांची संख्या ७० करण्यात आली आहे. या केंद्रांवर स्थानिक प्रभारी अधिकाऱ्यांवर बंदोबस्ताची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यात मतदान केंद्र व मतमोजणी ठिकाणी सतर्क राहण्याचे सूचना दिल्या. यादरम्यान मतदान केंद्रांवर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक पोलीस अधिकारी व केंद्राबाहेर १० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात केवळ मतदारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तैनात करण्यात आलेले बंदोबस्त मतदान झाल्यानंतर मतपेट्या मतमोजणी केंद्रावर जाईपर्यंत कायम ठेवला जाणार आहे.
पोलीस बंदोबस्त असा,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक -२
पोलीस उपअधीक्षक -५
पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक - २१
पोलीस उपनिरीक्षक - १२
पोलीस कर्मचारी -३५०