सरस सादरीकरणासाठी कलाकारांचा रात्रीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:32 PM2019-11-06T12:32:44+5:302019-11-06T12:35:34+5:30
राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत.
कोल्हापूर : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या वर्षी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत २९ संघांनी सहभाग नोंदविला असून, यातील पाच संघ नवीन आहेत. विशेष म्हणजे तब्बल २७ संघ हे जिल्ह्यातील आहेत; तर दोन संघ बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळणार आहे.
येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी सात वाजता २६ नाट्यसंस्थांची नाटके सादर होणार आहेत. तीन नाट्यप्रयोग दुपारी बाराच्या सुमारास सादर होणार आहेत. या स्पर्धेत दहाहून अधिक संहिता नव्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सहभाग नोंदविलेला आहे.
कोल्हापूर केंद्रावर कोकणसह सांगली, सातारा येथीलही संघ सहभागी होत होते. सध्या शहरासह शाहूवाडी, चंदगड, भुयेवाडी (ता. करवीर), चोकाक (ता. हातकणंगले), सेनापती कापशी (ता. कागल), इचलकरंजी, जयसिंगपूर, कसबा बावडा, निगवे (ता. करवीर) व बेळगाव येथील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, कलाकारांचा स्पर्धेच्या तयारीसाठी रात्रीचा दिवस सुरू आहे. शहरातील देवल क्लब, शिवाजी विद्यापीठाचा नाट्य विभाग, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर, स्टर्लिंग टॉवर, देवल क्लबसमोरील खासगी इमारत, आदी ठिकाणी कलाकार कसून सराव करीत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी विशेषत: रात्रीच्या वेळी तालमी रंगत आहेत.
संख्या वाढल्यामुळे यंदाच्या प्राथमिक फेरीत दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांना खास मेजवानीच मिळणार आहे.
- किरणसिंह चव्हाण,
दिग्दर्शक, अंदाधुंद
परिवर्तन फौंडेशन संस्था