भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मृताचे नातेवाईकही दुरावलेत. दहन करण्याची इच्छा असूनही त्यांना काळजावर दगड ठेवून लांब रहावे लागते. अशाप्रकारे रक्ताचे नाते गोठले तरी येथील पंचगंगा स्मशानभूमीत कोरोनाने मृत झालेल्या शवाचे दहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रूपाने माणुसकीची आग धगधगताना दिसते आहे. पण लॉकडाऊनमुळे तिथे रोज एक टन निर्माण होणारी राख वेळेत विल्हेवाट लावण्यात अडचणी येत आहेत.
कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याने मृतांचा आकडा दोन अंकी गाठला आहे. ५० च्यावर रुग्ण दगावत आहेत. शहर आणि जिल्हयात कोरोनाचा उद्रेक झाल्याने रोज मृतांची संख्या अंगावर शहारे आणणारी आहे. त्या मृतांच्या दहनावेळी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी त्या शवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांची संख्या ५० पेक्षा अधिक झाल्यानंतर प्रत्येक शवासाठी एक वाहन उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी होतात. अशावेळी एकाच वाहनातून दोन, तीन शव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेली जात आहेत. स्मशानभूमीत कोरोनाने मृत झालेल्यांसाठी राखीव असलेल्या ४७ पैकी शिल्लक बेडवर सरण रचण्याचे आणि विधीवत अंत्यसंस्कार करणे, त्यानंतर थोड्या अस्थी नातेवाईकांसाठी बाजूला काढून उर्वरित राख कुंड्यामध्ये एकत्र करण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे २४ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये करीत आहेत. ते कर्मचारी कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पीपीई किट परिधान करून सलग दोन महिन्यांपासून अंत्यसंस्कार करीत आहेत.
शवावरील नाव वाचून नातेवाईकांना अंतिम दर्शनासाठी पुकार करतात. दर्शन घेतल्यानंतर अग्नी देतात. अग्नी दिल्यानंतर चितेची आग आणि पीपीई किटमुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे त्या कर्मचाऱ्यांच्या अंगातून अखंडपणे घामाच्या धारा वाहतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशाही स्थितीत कर्मचारी कार्यरत आहेत.
कोट
पंचगंगा स्मशानभूमीत महिन्यापासून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची शव मोठ्या संख्येने येत आहेत. प्रत्येक शवावर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. पीपीई किट परिधान करून आलेल्या नातेवाईकासच जवळून अंतिम दर्शनाची परवानगी दिली जाते. मृतांची संख्या वाढल्याने अलीकडे रोज एक टन राख तयार होत आहे. ती जवळच्या गावातील शेतकरी घेऊन जातात.
अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक
कोरोनाने मृत होणाऱ्यांची संख्या वाढल्याने पंचगंगा स्मशानभूमी धगधगत ठेवावी लागते. अंत्यसंस्कारही आम्ही विधिवत करतो. मनात भीती असतानाही माणुसकीचे नात जपत हे काम करतो. त्याची दखलही समाजातील अनेक मंडळी घेऊन आम्हांला विविध प्रकारची मदत करतात.
बाबासाहेब भोसले, कर्मचारी
सुरूवातीला कोरोना बाधित शवावर अंत्यसंस्कार करताना भीती वाटत होती. पण आता पीपीई किट परिधान करून हे काम करतो. पीपीई किट वापरल्याने त्रास होतो. पण कामाचा भागच असल्याने ते करावे लागते. त्या शवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर निर्माण होणारी राख एकत्र करतो.
विलास कांबळे, कर्मचारी
चौकट
एक टन राख
पंचगंगा स्मशानभूमीत सध्या रोज एक टन राख आणि अस्थी तयार होते. ती सुरक्षितपणे बाजूला काढून ठेवली जाते. एकत्रित कुंडात गोळा केली जाते. हे जोखमीचे कामही कर्मचारी काटेकोरपणे करताना दिसतात.
चौकट
नॉन कोविडसाठी तीन ठिकाणी सोय
कोरोना न झालेल्या शवाच्या अंत्यसंस्काराची सोय शहरातील बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा या ठिकाणच्या स्मशानभूमीत करण्यात आली आहे. पंचगंगा स्मशानभूमी केवळ कोरोना बाधित शवाच्या दहनासाठी ठेवल्याने या ठिकाणी दहन करण्यात येणारे शवही तीन ठिकाणी जात आहेत. परिणामी त्या तिन्ही स्मशानभूमीवरही अतिरिक्त ताण येत आहे.
तीन ठिकाणी प्रत्येकी एक ट्रॉली
बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा स्मशानभूमीत प्रत्येकी एक ट्रॉली राख आणि अस्थी तयार होते. याठिकाणी राख संकलित करण्याची चांगली व्यवस्था आहे. येथील शिल्लक राख शेतकरी घेऊन जातात.
चौकट
शेतीसाठी राख
स्मशानभूमीत निर्माण होणारी राख आणि अस्थींचा वापर काही शेतकरी खत म्हणून नियमित करतात. साठवून ठेवण्याची चांगली व्यवस्था असल्याने ती राख शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घेऊन जातात. राख शिल्लक राहण्याची समस्या निर्माण होत नाही. लॉकडाऊन असले तरी शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर वाहतुकीस परवानगी आहे. यामुळे राख, अस्थींची नियमित उचल होत आहे.