कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदले दिवशी वेगवान घडामोडी घडल्या असून, सकाळी माने यांच्या जनसुराज्यच्या उमेदवारीवर विनय कोरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर माने यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रतोद विजय भोजे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.दुसरीकडे शिरोळ तालुक्यातून ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे नेते अनिल यादव यांनीही जनसुराज्यची उमेदवारी स्वीकारली असून, हे दोघेही आज, शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हातकणंगले येथून १५ वर्षांपूर्वी राजीव आवळे जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते.
भाजप शिवसेना युती झाल्यानंतर जनसुराज्यकडे इच्छुकांची गर्दी झाली असून, यामध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वत: विनय कोरे आणि समित कदम या सर्वांशी गेले दोन दिवस चर्चा करीत असून, जिल्ह्यातील १० पैकी पाच मतदारसंघांत ‘जनसुराज्य’चे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.वरील दोन उमेदवारांव्यतिरिक्त ‘जनसुराज्य’चे संस्थापक विनय कोरे हे स्वत: पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’मधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्याच पद्धतीने चंदगडमधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. २००४ साली याच मतदारसंघातून नरसिंगराव पाटील जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते; मात्र करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, इचलकरंजी, भुदरगडमध्ये जनसुराज्यचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे.युतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यताएकीकडे जिल्ह्यातील १0 पैकी ८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेला जागा मिळाल्या असताना भाजपचेच नेते किमान चार ठिकाणी बंड करण्याच्या तयारीत आहेत. समरजितसिंह घाटगे, अशोकराव माने, अनिल यादव हे तीनही भाजपचे नेते शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात बंडाचा वणवा पेटला आहे.