अथर्व तू पुन्हा शाळेला येशील का..? नणुंद्रेतील अथर्वच्या मृत्यूने गाव गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 07:19 PM2023-07-30T19:19:37+5:302023-07-30T19:19:58+5:30
अथर्व हा कोतोलीतील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दहावीत होता. शांत व मनमिळावू स्वभावामुळे गुरूजीन प्रिय विदयार्थी म्हणून त्याची ओळख.
- विक्रम पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : परिस्थितीशी दोन हात करत आई वडीलांनी काबाडकष्ट करून तळहाताच्या फोडासारखा जपून मोठा केला. दहावीच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवू लागला. गोरागोमटा, शांत व मनमिळावू स्वभाव, अभ्यासात अतिशय हुशार पण नियतीला या सर्व गोष्टी कदाचित बघावल्या नसतील म्हणूनच की काय आठवडाभर सुरू असलेल्या उपचारा नंतर पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील अथर्व अरूण पाटील याचा आकस्मित मृत्यू झाला. अथर्व तू पुन्हा शाळेला येशील का..रे, तुझा हसरा चेहरा कसा विसरू रे..असे म्हणत त्याच्या वर्गातील मित्र मैत्रीणींनी फोडलेला हबंरडा पाहून सारा गाव हळहळला.
अथर्व हा कोतोलीतील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दहावीत होता. शांत व मनमिळावू स्वभावामुळे गुरूजीन प्रिय विदयार्थी म्हणून त्याची ओळख. प्रेमळ स्वभावामुळे मित्रमैत्रीनींचा गोतावळा देखील मोठा होता. आठ दिवसापूर्वी अचानकपणे अथर्वच्या दातातून रक्त येत असल्याचे त्याला जाणवले. त्याने ही बाब घरच्यांना सांगितली. लगेच खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अथर्व पुन्हा शाळेला जाऊ लागला. दोन दिवसांनी तसाच त्रास त्याला पुन्हा जाणवू लागल्याने कोल्हापूरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते पण अचानक असे काय घडले की,अथर्वने उपचारापुढे हार मानली अनं डाॅक्टरांनी अथर्वचा मृत्यू झाल्याचे कुटूंबियांना सांगितले.
हृदयविकाराचा झटका आल्याचे डाॅक्टरांनी कारण सांगितले असले तरी कोवळ्या वयात अचानक मृत्यू पावलेल्या अथर्वच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरच्यासह त्याच्या शाळेतील शिक्षक व मित्रमैत्रणींना कळताच सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नियमित शाळेत येणारा व मित्र मैत्रणीमध्ये रमणारा अथर्व आता पुन्हा शाळेत कधीच भेटणार नसल्याने मृतदेह पाहून मित्र मैत्रीणींनी हंबरडा फोडला. मनमिळावू अथर्वच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील एक भाऊ असा परिवार आहे.