संजय मंडलिकांना पुन्हा राष्ट्रवादीच्या सावलीत आणण्याचे प्रयत्न

By admin | Published: February 24, 2016 12:58 AM2016-02-24T00:58:00+5:302016-02-24T00:58:00+5:30

राजकारण नव्या वळणावर : शरद पवार यांच्या हस्ते होणार मंडलिक यांच्या पुतळ््याचे अनावरण; संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचीही चर्चा

Attempts to bring Sanjay Mandalis back to the Nationalist shadow | संजय मंडलिकांना पुन्हा राष्ट्रवादीच्या सावलीत आणण्याचे प्रयत्न

संजय मंडलिकांना पुन्हा राष्ट्रवादीच्या सावलीत आणण्याचे प्रयत्न

Next

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
शरद पवार यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाले, अशी घणाघाती टीका करून त्यांना सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान देऊन अपक्ष म्हणून विजयी झालेले दिवंगत नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे आता चक्क शरद पवार यांच्याच हस्ते अनावरण होत आहे. येत्या दि. १० मार्चला हा समारंभ घेण्याचे नियोजन सुरू आहे. मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचाच भाग म्हणून पवार जाणीवपूर्वक या समारंभास स्वत:हून हजर राहणार असल्याचे सांगण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण त्यामुळे नवे वळण घेत आहे.
मंडलिक यांचे गतवर्षी दि.९ मार्चला मध्यरात्री निधन झाले. त्यामुळे त्यांचा तारखेनुसार येत्या दि.१० मार्चला पहिला स्मृतिदिन येत आहे. तिथीनुसार तो दि. २६ मार्चला येतो. हमीदवाडा (ता.कागल) येथील मंडलिक यांनीच उभारणी केलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या आवारात हा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात संजय मंडलिक यांची अन्य एका बैठकीच्या निमित्ताने पवार यांची भेट झाली व त्यांनी मंडलिक यांच्या स्मृतिदिनाचे काय नियोजन केले आहे, याची स्वत:हून विचारणा केली. पुतळा उभारण्यात आल्याचे सांगून संजय मंडलिक यांनी त्याच्या अनावरणाचे निमंत्रण त्यांना दिले. पवार यांनी ते स्वीकारले. या समारंभास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे समजते; परंतु पवार आहेत म्हटल्यावर अन्य नेते कितपत उपस्थित राहतात याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. झाले गेले विसरून जाऊया, अशीही भूमिका पवार यांच्याकडूनच पुढे आल्याचे सांगण्यात येते.
सदाशिवराव मंडलिक हे तसे पवार यांचे सुरुवातीपासून खंदे समर्थक; परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणातून मंडलिक व त्यांचे शिष्य आमदार हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय वैर सुरू झाले. त्यात पवार यांनी मुश्रीफ यांची बाजू घेतली. मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. लोकसभेच्या सन २००९ च्या निवडणुकीत त्यांची स्वत:हून थांबायची तयारी होती; परंतु उमेदवारी देताना आपल्याला विश्वासात घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता परंतु पवार यांनी तो जुमानला नाही म्हणून मंडलिक यांनी पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक जिंकून दाखविली. युवराज संभाजीराजे यांचा त्यांनी ४४ हजार मतांनी पराभव केला व देशाच्या राजकारणात काँग्रेसला पाठिंबा दिला, परंतु पवार फारच बेरकी त्यांनी गत निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्यासारख्या तगड्या युवा उमेदवारास संधी दिली व कोल्हापूरची जागा पुन्हा राष्ट्रवादीला जिंकून दाखविली. महाडिक यांच्याविरोधात संजय मंडलिक यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला; परंतु त्यांचा महाडिक यांनी ३३ हजार मतांनी पराभव केला. पुढच्या लोकसभा निवडणुकीस अजून किमान तीन वर्षांचा अवधी आहे; परंतु त्यासाठीच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत. पुतळा अनावरण समारंभ हा त्याचाच भाग असल्याचे मानण्यात येते.
आता जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे खासदार महाडिक हे त्या पक्षापासून दुरावले आहेत. विधानसभेलाही ते पक्षासोबत नव्हते. महापालिका निवडणुकीतही त्यांनी भाजपशी संगत केलेल्या ताराराणी आघाडीचेच काम केले. खासदारांनीच विरोध केल्यामुळे राष्ट्रवादीचा महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनीही केला होता. आमदार मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्यात पक्षीय वर्चस्वाचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांना पर्याय शोधण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू झाले आहे. मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत घेऊन त्यादिशेने एक पाऊल टाकले. त्यानंतर पुढच्या टप्प्यात विधान परिषदेला सतेज पाटील, मुश्रीफ व संजय मंडलिक हे तिघे महाडिक यांच्या विरोधात एकत्र आले. आता हीच गट्टी पुढच्या राजकारणातही एकत्र राहणार हे स्पष्टच दिसते. त्यामुळे मंडलिक यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या सावलीत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पवार यांची पुतळा अनावरण समारंभातील उपस्थिती ही त्याचीच द्योतक आहे.
‘कागल’ केंद्रस्थानी ठेवूनच जुळणी
खासदार महाडिक यांचे अलीकडच्या काळात भाजपशी चांगले संबंध आहेत. त्यांचे चुलतभाऊ अमल महाडिक हे भाजपचेच आमदार आहेत. महादेवराव महाडिक यांनाही विधान परिषद निवडणुकीत भाजपनेच पाठिंबा दिला होता. भाजपलाही पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी महाडिक यांच्यासारखे नेते हवेच आहेत. त्यामुळे ते कदाचित आगामी निवडणुकीत भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. राष्ट्रवादीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देऊन कागल विधानसभा निवडणुकीचे आमदार मुश्रीफ यांचेही राजकारण सुरक्षित होऊ शकते. गत विधानसभा निवडणुकीत त्यांना संजय घाटगे यांनी निकराची लढत दिली. त्यामुळे त्यांना विधानसभेला मंडलिक गट बरोबर असेल तर सोपे जाते. त्याची पायाभरणी त्यांनी सुरू केली आहे.
अमृतमहोत्सवही पवार यांच्याच उपस्थितीत...
दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांचा सन २००९ मध्ये अमृतमहोत्सव झाला. सासने मैदानावर झालेल्या या समारंभास शरद पवार हेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना पवार हे आपल्या गाडीतून घेऊन गेले व त्यानंतर झालेल्या घडामोडीत धनंजय महाडिक यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाला व संभाजीराजे यांचे नाव निश्चित झाले. पुढच्या घडामोडीत मंडलिक यांनीच पवार यांना आव्हान दिले. आता संजय मंडलिक हे जर राष्ट्रवादीच्या सावलीत येणार असतील, तर एक वर्तुळ पूर्ण होऊ शकेल.

Web Title: Attempts to bring Sanjay Mandalis back to the Nationalist shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.