सरूड :गोकूळच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये आमदार विनय कोरे सामील झाल्याने नाराज झालेल्या सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी या आघाडीतून बाहेर पडावे, अशी आग्रही मागणी केल्याने या निवडणुकीत माजी आमदार सत्यजीत पाटील कोणती भूमिका घेणार? याकडे सत्तारूढ तसेच विरोधी आघाडीचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान सरूडकर गटाची हीच नाराजी विरोधी आघाडीसाठी धोकादायक ठरू शकत.
माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या मातोश्री अनुराधा पाटील या २००७ पासून गोकूळच्या संचालिका आहेत. गोकूळच्या राजकारणात माजी आमदार सत्यजीत पाटील हे नेहमीच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याबरोबर राहिले आहेत. परंतु गोकूळच्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून झालेल्या घडामोडीमुळे माजी आमदार सत्यजीत पाटील हे महाडिक विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या छावणीत दाखल झाले. या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजपमुळे सत्तारूढ गटाबरोबर राहील, असा कयास सरूडकर गटाच्या कार्यकर्त्यांचा होता. मात्र डॉ. विनय कोरे यांनीही या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याने तसेच विरोधी आघाडीच्या नेत्यांनीही त्यांना सहभागी करून घेतल्याने सरूडकर गटाच्या कार्यकर्त्यांतून सध्या नाराजीचा उद्रेक होत आहे.
गेल्या १४ वर्षापासून माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी गोकूळच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील दूध संस्थांवर आपली चांगलीच पकड निर्माण केली आहे . तालुक्यातील एकूण २८७ ठरावधारकांपैकी २१५ ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा प्रथमपासूनच सरुडकर गटाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या भूमिकेला या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यकर्त्याना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार : पाटील
आजपर्यंतच्या राजकारणात आपण नेहमीच आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व त्याच्यांशी चर्चा करूनच आपले सर्व राजकीय निर्णय घेत आलो आहे. त्यामुळे गोकूळच्या या निवडणुकीतही शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपण योग्य तो पुढील निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.